वार्तांकनासाठी निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास उपयुक्त – माजी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जून २०२२ । मुंबई । थोडीशी किचकट, तांत्रिक माहितीवर आधारित असली तरी, नेमकेपणाने वार्तांकन करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया जाणून घेणे, त्याचा अभ्यास करणे उपयोगी ठरेल, असे मत विधान मंडळाचे माजी प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी व्यक्त केले. 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई यांनी मंत्रालय पत्रकार कक्षात आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी विधान मंडळाचे माजी उपसचिव सुभाषचंद्र मयेकर उपस्थित होते.

डॉ. कळसे यांनी पत्रकारांशी निवडणूक प्रक्रिया त्यातील संबंधित तांत्रिक बाबी यासंदर्भात संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडून येण्यासाठी मतांचा कोटा, प्रत्येक मतांचे मूल्य किती असते, सरप्लस मते म्हणजे काय, मतमोजणी प्रक्रिया कशी होते, मतपत्रिका कशी बाद होते, मतदान करताना सदस्यांनी कोणती काळजी घ्यावी इत्यादी अनेक तांत्रिक, किचकट बाबींवर प्रकाश टाकला. मतदान प्रक्रिया सोदाहरण स्पष्ट करुन दिली. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतील बारकावे, फरक स्पष्ट केले. ब्रिटीश पार्लमेंटच्या निवडणूक प्रक्रियेशी भारतीय निवडणूक प्रक्रियेचा जवळचा संबंध असल्याने त्याचाही अभ्यास करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला.

श्री.मयेकर यांनी विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया स्पष्ट केली. प्रपोशनल रिप्रेझेंटेशन (प्रमाणशील प्रतिनिधित्व) मुळे विविध घटकांना प्रतिनिधित्व मिळत असल्याचे सांगीतले. राष्ट्रपती निवडणुकीसाठी राज्यातील मतांचे मूल्य सांगितले. भारतीय संविधानात असलेल्या विविध तरतुदींची माहिती दिली. ही प्रक्रिया समजून घेण्यामुळे आपल्या माहिती व ज्ञानात भर पडण्यास मदत होईल असे श्री. मयेकर म्हणाले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांनी निवडणुकीचा गाभा न कळल्यास वार्तांकन करता येत नाही. या निवडणुकीची प्रकिया, तपशील, खाचाखोचा समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन ओळख करुन दिली.

यावेळी योगेश त्रिपाठी, मिलिंद लिमये, शाम हांडे, वैशाली होगले, बाळासाहेब पाटील, प्रशांत बारसिंग, राजू झनके, अजय गोरड, संतोष प्रधान, राजेंद्र थोरात यांच्यासह विविध वृत्तपत्रे, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!