
स्थैर्य, सातारा, दि. 12 ऑगस्ट : हिंदवी पब्लिक स्कूल, सातारा येथे आज रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून ’ऑपरेशन सिंदूर’ उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशासाठी कार्यरत असलेल्या ऑपरेशन सिंदूर मधील सहभागी जवानांना तसेच सीमेवर कार्यरत असलेल्या जवनांना व त्यांच्या पत्नींना शाळेत आमंत्रित करून विद्यार्थ्यांनी त्यांना राख्या बांधून आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जूनियर कमांडिंग ऑफिसर अमोल सुभाष देशमुख व सुभेदार धनाजी पोळ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी हिंदवी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अमित कुलकर्णी , गुरुकुलाच्या कार्यकारी संचालिका सौ. रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती काटकर आणि उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थिनी आसावरी जाधव हिने कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका मा. ज्योती दी. यांनी प्रमुख पाहुण्यांना शाळेची ओळख करून दिली. त्यानंतर अभ्यागतांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना देशसेवा व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
यानंतर अमित कुलकर्णी रक्षाबंधनानिमित्त सर्व उपस्थितांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांच्या हातून देशकार्य घडण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सौ. रमणी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये व सेवाभावाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात उपस्थित जवानांच्या पत्नींना विद्यार्थ्यांनी राख्या बांधून त्यांच्याबद्दल सन्मान व्यक्त केला, तर जवानांना सुद्धा राख्या बांधून त्यांच्याप्रती प्रेमभावना दर्शविल्या.
प्रमुख अभ्यागत अमोल सुभाष देशमुख यांनी सोनचाफा देऊन शाळेप्रती प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा पाटील यांनी केले. ’ऑपरेशन सिंदूर’ उपक्रमांतर्गत राबवलेला रक्षाबंधनाचा हा आगळावेगळा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व देशभक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.