
दैनिक स्थैर्य | दि. १६ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
महाविद्यालयीन स्तरावर अभ्यासक्रमाशिवाय विविध अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात खूप उपयुक्त ठरतात. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासात गती प्राप्त होते. अशा उपक्रमांतील सहभाग व उपस्थितीमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणंघडण देखील होते. तसेच या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील गुणकौशल्यांचा विकास होतो, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व मुधोजी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अरविंद मेहता यांनी केले.
मुधोजी महाविद्यालयअंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि मानव्यविद्या व विज्ञान शाखा आयोजित ‘समाज- भाषा – विज्ञान’ महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. तुकाराम शिंदे, मानव्यशास्त्र शाखाप्रमुख डॉ. अशोक शिंदे, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. मोनाली पाटील आणि पदव्युत्तर शाखाप्रमुख डॉ. सरिता माने यांची उपस्थिती होती.
मेहता पुढे म्हणाले की, मुधोजी महाविद्यालय हे शिवाजी विद्यापीठातील एक नामांकित महाविद्यालय आहे. श्रीमंत मालोजीराजे यांनी दूरदृष्टीने या महाविद्यालयाची उभारणी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाची सोय व्हावी, या प्रमुख उद्देशातून सुरू केलेल्या या महाविद्यालयातून आज हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल झालेले आहे. आज राज्याच्या सर्व भागात विविध पदांवर या महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकदार कामगिरी करताना दिसतात. या महाविद्यालयास एक उत्तम शैक्षणिक परंपरा असून येथे सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे विविध उपक्रम राबविले जातात. आजपासून सुरू होणार्या या ‘समाज- भाषा – विज्ञान’ महोत्सवात देखील विद्यार्थी विकासाच्या विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे. यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या उपजत कलाकौशल्य व गुणांचा सर्वांगीण विकास होईल, असा मला विश्वास वाटतो.
यावेळी मेहता यांनी या महोत्सवाचे डिजिटल उद्घाटन करून विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य कदम यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा आढावा घेऊन महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये विद्यार्थांची भूमिका स्पष्ट केली. या महोत्सवातील सर्व उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून सर्व विद्यार्थांनी या उपक्रमात सहभाग घेऊन हा महोत्सव यशवी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी श्रीमंत मालोजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. मानव्यविद्या शाखाप्रमुख डॉ. अशोक शिंदे या आपल्या प्रस्ताविकात महोत्सवाचा उद्देश व महोत्सवांतर्गत आयोजित प्रशमंजूषा, निबंध लेखन, वादविवाद, प्रतिसंसद, पोस्टर व मॉडेल, रांगोळी, चित्रकला, वृक्ष प्रदर्शन, स्वास्थ्य व नेत्र तपासणी, कवी संमेलन, समूह चर्चा, नाट्य सादरीकरण, लघुचित्रपट दर्शन अशा विविध उपक्रमांचे नियोजन व माहिती दिली. विज्ञान शाखाप्रमुख डॉ. मोनाली पाटील यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख, विविध उपक्रमांचे समन्वयक, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.