
स्थैर्य, टाकळवाडे, दि. ०९ सप्टेंबर : अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त टाकळवाडे, ता. फलटण येथील गुणवंत आणि यशस्वी व्यक्तिमत्वांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात, “विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून गावचे व आई-वडिलांचे नाव मोठे करावे. अभ्यास करताना नेहमी आपल्या आई-वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवावेत,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी टाकळवाडे प्राथमिक शाळेतील विविध खेळांतील यशस्वी विद्यार्थी, शासकीय नोकरीत भरती झालेली तरुण मंडळी आणि पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांसह एकूण ३० सत्कारमूर्तींना ट्रॉफी, शाल आणि गुलाबाचे रोप देऊन गौरविण्यात आले. अजिंक्य मित्र मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे तहसीलदारांनी यावेळी कौतुक केले.
सत्कारमूर्तींच्या वतीने महात्मा गांधी महाविद्यालय, दहिवडीचे उपप्राचार्य बाळासाहेब मिंड आणि फलटण शहर पोलीस उपनिरीक्षक अंकुश इवरे यांनी मनोगत व्यक्त करताना, आपल्या जडणघडणीत गावाचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास जानाई हायस्कूलचे शिक्षक निळकंठ निंबाळकर, प्रा. प्रवीण निंबाळकर, शिवसेना फलटण तालुका प्रमुख नानासाहेब उर्फ पिंटू इवरे, सरपंच परिषद फलटणचे अध्यक्ष राहुल इवरे, पत्रकार पोपट मिंड, संभाजी ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील करे, प्रास्ताविक प्रा. अमोल पवार तर आभार मल्हारी जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शफिक शेख, फौजी सुजित डांबे, उत्कर्ष जाधव, प्रथमेश करे, आरिफ शेख, तुकाराम खांडेकर, कु. सनम शेख व कु. वैष्णवी जाधव यांनी परिश्रम घेतले.