विद्यार्थ्यांनी जीवनमूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान दोन्ही आत्मसात करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । पुणे । योगशक्ती आणि सामर्थ्य या दोन्ही गोष्टींच्या समन्वयाने जीवनात यशस्वी होता येते हा गीतेचा संदेश आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी सदाचाराचे व्रत अंगिकरताना जीवन मूल्यांसह जगातील आधुनिक तंत्रज्ञानही आत्मसात करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठात आयोजित ८ व्या जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्वज्ञान संसदेचे उदघाटन, भगवद्गीता ज्ञानभवनाचे लोकार्पण आणि तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमटाच्या विश्वार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पद्मभूषण डॉ. विजय भटकर, विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड, ज्योती ढाकणे, स्वाती चाटे, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ.सुचित्रा नागरे आदी उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, चांगल्या वर्तणुकीने व्यक्तीची माणूस म्हणून ओळख होते, अधिक चांगुलपणा असल्यास त्याला देवत्व प्राप्त होते. यासाठी साधनेची आणि मूल्यांच्या अनुसारणाची गरज आहे. पण त्याचबरोबर आपल्या क्षमतांचा विकास केल्यास जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला योगदान देता येईल.

एमआयटी विद्यापीठाचे कार्य लक्षात घेता माणसाला भौतिकतेकडून अध्यात्मिकतेकडे नेणारे हे विद्यापीठ आहे असे म्हणावे लागेल. या विद्यापीठाचे विश्वशांती स्थापनेचे कार्य विस्तारत जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ.विश्वनाथ कराड म्हणाले, वैश्विक भारतीय संस्कृतीचे रूप या विश्वशांती घुमटामध्ये सामावले आहे. जगातील तत्वचिंतकांचा विचार या एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे. जगात सुख, समाधान आणि शांतीचा संदेश या ठिकाणाहून जगात जावा असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.भटकर म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाच्या माध्यमातून भारत विश्वगुरु पदापर्यंत पोहोचू शकेल. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी असा समन्वय घडवून आणावा.

डॉ.मंगेश कराड यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ.राहुल कराड यांनी विद्यापीठाच्या उपक्रमांची माहिती दिली.

 

या प्रसंगी श्रीमद् भगवद्गीता ग्रंथाच्या सव्वा लाख प्रतिंचे भारतातील विद्यार्थ्यांना वितरण करण्याच्या शुभारंभ राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आला. लक्ष्मण घुगे यांनी लिहिलेल्या सोप्या भाषेतील ‘पावन पवित्र ज्ञानेश्वरी’ ग्रंथाचे प्रकाशनही श्री.कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!