दैनिक स्थैर्य | दि. 26 डिसेंबर 2023 | फलटण | विद्यार्थ्यांनी खेळात झोकुन देऊन यश मिळविण्याचा सल्ला क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे यांनी यावेळी दिला. तर प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांने सरावासाठी ग्राउंडचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले.
मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर कनिष्ठ विभागामार्फत दोन दिवसीय हिवाळी आंतरकूल क्रीडा स्पर्धेचे 22 व 23 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ॲथलेटिक्स, क्रिकेट, रस्सीखेच, संगीत खुर्ची या खेळ प्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेचे उद्घघाटन क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे यांच्या शुभहस्ते व मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम अध्यक्षतेखाली व उपप्राचार्य डॉ.संजय दिक्षित, संजय वेदपाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये उपप्रचार्य वेदपाठक यांनी खेळाचे जीवनातील महत्व सांगुन यश – अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले.
शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेसाठी इयत्ता 11 वी व 12 वी मधील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथमच क्रिकेट या खेळाचा समावेश करण्यात आला होता.
शनिवारी १०० मी, ४००मी, रस्सीखेच, संगीतखुर्ची, क्रिकेट या क्रीडा प्रकारांनी समारोप करण्यात आला.
क्रिकेट मध्ये ११वी विज्ञान शाखेचा संघ विजेता ठरला. रस्सीखेच क्रीडा प्रकारात मुलांमध्ये कला शाखेचा व मुलीमध्ये वाणिज्य शाखेचा संघ विजेता ठरला.
यावेळी कु. अनामिका धनावडे हिचा राज्यस्तरीय खो – खो स्पर्धेसाठी तसेच प्रा. रणधीर मोरे व प्रा. रवींद्र काळेबेरे यांचा ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात परीक्षक म्हणून मार्गदर्शन केले याबद्दल कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संजय वेदपाठक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कनिष्ठ विभाग क्रीडा प्रशिक्षक प्रा. शेंडगे व त्यांच्या सर्व सहकारी प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. हिवाळी क्रीडा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल मुधोजी महाविध्यालयातील कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक व यशस्वी खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.