दैनिक स्थैर्य | दि. २७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती करून बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या देशातच संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन निमकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर पद्मश्री डॉ. अनिल राजवंशी यांनी केले आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण येथे ‘कुरुक्षेत्र २०२३’ या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेचे उद्घाटन निमकर अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर, पद्मश्री डॉ. अनिल राजवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
स्पर्धेच्या उद्घाटनानंतर उपस्थित स्पर्धकांना मार्गदर्शन करत असताना पद्मश्री डॉ. अनिल राजवंशी यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती करून बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपल्या देशातच संधी निर्माण कराव्यात व देश उभारणी करण्यात मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहन केले. तसेच जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी सर्व संधी समानच असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण ग्रामीण भागातील आहोत, असा न्यूनगंड न बाळगता स्पर्धेला तयार रहावे, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी पद्मश्री डॉ. अनिल राजवंशी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांना मार्गदर्शक म्हणून सहकार्य करावे, असे आवाहन केले व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
फलटण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सन २०१४-१५ पासून कुरुक्षेत्र या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होत असतात व त्यांचे प्रकल्प सादर करत असतात. यावर्षी विविध विभागांचे मिळून एकूण २४ स्पर्धा प्रकार आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये रोबोरेस, कॅडवॉर, असेंबली मेकिंग, पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेसेंटेशन, मॉडेल मेकिंग, सिविल आयडी, वेस्ट टू बेस्ट क्रिएशन, प्रश्नमंजुषा सारखे स्पर्धा प्रकार आयोजित करण्यात आले होते. विविध महाविद्यालयातील ११३० विद्यार्थ्यांनी या स्पर्धा प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक प्रा. गोविंद ठोंबरे यांनी दिली.
मान्यवरांच्या हस्ते या सर्व स्पर्धा प्रकारांचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर परीक्षकांनी प्रकल्पांचे परीक्षण केले व नंतर सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण समारंभ घेऊन विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम स्वरूपात बक्षीस वितरण करण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांनी दिली.
स्पर्धेचे विजेते, उपविजेते तसेच सहभागी स्पर्धक यांचे विधान परिषदेचे माजी सभापती तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, महाविद्यालय व्यवस्थापन समिती चेअरमन श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, सर्व महाविद्यालय व्यवस्थापन समिती सदस्य, प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र नार्वे, उपप्राचार्य प्रा. मिलिंद नातू यांनी अभिनंदन केले.