विद्यार्थ्यांना तणावरहित शिक्षण दिले पाहिजे : श्रीमंत रामराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे शिक्षण त्यांना उपलब्ध झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना  समाज घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षण व शिक्षकांचे महत्व अनन्य साधारण आहे, त्यांनी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीवर जाऊन त्यांना समजेल असे तणावरहित शिक्षण दिले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित डीईएस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मातृमंदिर संस्कार केंद्र या पूर्व प्राथमिक विभागाच्या विस्तारित व स्वतंत्र इमारतीचे भूमीपूजन समारंभात अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते, खा. गिरीश बापट विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते, सोसायटी नियामक मंडळ व परिषद अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी वगैरे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

चांगले शिक्षक निर्माण होण्यासाठी त्यांना नियमित प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, त्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करताना शिक्षकांनी विद्यादानाबरोबर विद्यार्थी बनून शिकत राहिले पाहिजे त्यामुळे नवीन काय घडतंय त्याची, शिक्षण क्षेत्रातील बदलांची माहिती त्यांना मिळेल असा विश्वास श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने स्वतंत्र विद्यापीठ उभारणीसाठी प्रयत्न करावा त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत त्याची आज गरज असल्याचे प्रतिपादन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

 जगाच्या बाजारी करणात दोन पाय पक्के रोवून उभे रहायचे असेल तर शालेय शिक्षण महत्वाचे असल्याचे नमूद करीत शाळा तेथील अभ्यासक्रम, संस्कार, शिक्षक यातून विद्यार्थी घडतो तसा तो मैदानावर घडतो, खेळातून त्याचा आत्मविश्वस वाढतो त्यासाठी शाळांची मैदाने सुरक्षीत राहतील यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता खा. गिरीश बापट यांनी व्यक्त केली.

प्रख्यात गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी व्हिडिओद्वारे संवाद साधून, कोणीतरी सांगितले म्हणून अभ्यास करु नये, मुलांमध्ये अभ्यासाविषयी आवड निर्माण झाली पाहिजे, शिक्षकांनी मुलांना अभ्यासासाठी उद्युक्त केले पाहिजे, छोटे खेळ, कोडी यातून आवड निर्माण करता येते, पूर्वी पाठांतरावर भर होता, आजही पाठांतर पूर्ण काढता येणार नाही, आवश्यक ते पाठांतर चटकन कसे होईल यासाठी सोप्या पद्धतीने शिकविले पाहिजे.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी शिक्षण क्षेत्रात १३० वर्षे कार्यरत असून संस्थेची ६० शाळा महाविद्यालये आहेत, संस्थेचा विस्तार करताना गुणवत्ता राखून तो सातत्याने वाढविण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करताना शिक्षक हा समाजाचा आधार आणि मार्गदर्शक असला पाहिजे त्यादृष्टीने आम्ही समाजासाठी विविध उपक्रम हाती घेत असल्याचे डॉ. शरद कुंटे यांनी प्रास्तविकात नमूद केले.

प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर डॉ. शरद कुंटे यांनी श्रीमंत रामराजे यांना संस्थेच्यावतीने सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित गौरव केला, सन्मानपत्रात श्रीमंत रामराजे राजघराण्यातील असल्याने त्यांना प्रजेच्या समस्यांची माहिती व त्या सोडविण्याची क्षमता उपजत आहे, त्यातून त्यांनी शेती व शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्याचे निदर्शनास आणून देत मातीशी नात जपत गगनाला गवसणी घालणाऱ्या कृषी संस्थानिकाला हे सन्मानपत्र प्रदान करुन आम्ही कृत कृत्य झाल्याची भावना डॉ. कुंटे यांनी व्यक्त केली. यावेळी खा. गिरीश बापट यांचाही यथोचित गौरव करण्यात आला.

डीईएस प्रायमरीच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांनी सूत्रसंचालन, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!