मुधोजी महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा नावलौकिक वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनो सदैव तत्पर रहा : पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ जानेवारी २०२३ । फलटण । मोबाईलच्या ऑनलाइन गेम व सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळून विद्यार्थ्यांनी मुधोजी महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा नावलौकिक वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर राहावे असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर यांनी केले.

मुधोजी महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेज च्या इयत्ता बारावी आर्ट्स , कॉमर्स व सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी नम्रता हा गुण अंगी बाणवावा तसेच प्रत्येक संधीचे सोने करावे व अनुभवातून काही ना काही शिकत रहावे असा सल्ला बारामती शहराचे पी.एस.आय , श्री. गणेश निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली व पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक प्रा. दिलीप शिंदे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की कला शाखेतील विद्यार्थी उच्च पदावर जाऊ शकतात व मुधोजी ज्युनिअर कॉलेजचे कला शाखेतील अनेक माजी विद्यार्थी आज श्री.गणेश निंबाळकर साहेब यांच्या प्रमाणे उच्च पदावर कार्यरत आहेत.

यानंतर बक्षीस वितरण समारंभात आदेश माने , स्वप्निल निकम , आदित्य तरटे, शिवाजी टकले , तुषार चव्हाण या मुधोजी महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या एन .सी. सी . कॅडेट यांची नुकतीच इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच कला , क्रीडा , राष्ट्रीय सेवा योजना इत्यादीमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व मेडल देऊन गुणगौरव करण्यात आला.

विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना अवधूत टिके , श्रेया देवकर , प्रियंका शिंदे , विशाखा कांबळे , वेदांत मोरे, ज्योती रिटे यांनी कॉलेजच्या पहिल्या दिवशी वाटणारी भीती नाहीशी होऊन घट्ट नातेसंबंध निर्माण झाल्याचे , वृक्ष प्रेम , पर्यावरण संवर्धन , आदर , सहकार्य इत्यादी मूल्ये मिळाल्याची व अभ्यासाबरोबरच कला , क्रीडा , साहित्य इत्यादी क्षेत्रातील आवड मुधोजी ज्युनिअर कॉलेजमुळे जोपासली गेल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

यावेळी मुधोजी महाविद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. संजय वेदपाठक यांनी ज्युनिअर कॉलेजची यशाची परंपरा अशीच पुढे चालू ठेवण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले व बोर्ड परीक्षा बद्दल महत्त्वाच्या सूचना देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम व सर्व प्राध्यापकवृंद यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ नीलम देशमुख यांनी केले व आभार प्रा.सौ.उमा भोसले यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!