
स्थैर्य, फलटण, दि. 16 डिसेंबर : कॉमर्स पदवीबरोबरच विद्यार्थ्यांना जीएसटी व करविषयक व्यवहारांचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. या ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होऊ शकेल. आज प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना उद्योजकांना कंपन्यांना टॅक्स सल्लागारांची आवश्यकता असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे शॉर्ट टर्म कोर्सेमधून कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी शिकवलेल्या मूलभूत संकल्पनांबरोबरच त्यांचा प्रत्यक्षातील वापर कसा करावा. सध्याच्या काळात विद्यार्थ्यांनी तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
येथील मुधोजी महाविद्यालय व चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
चार्टर्ड अकाउंटंट मेहुल मेहता म्हणाले, कॉमर्स विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांच्याकडे मूलभूत संकल्पनांचे ज्ञान असतेच परंतु त्याला अशा प्रकारच्या व्यावसायिक ज्ञानाची जोड दिली तर व्यवसायाची गरज पूर्ण होईल. असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक महाविद्यालयात अशाप्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेणार आहोत. जिल्ह्यातील मुधोजी महाविद्यालयात पहिल्यांदाच या कार्यशाळेचे आयोजन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कार्पोरेट अकाउंटिंग, पार्टनरशिप अकाउंटिंग बरोबरच एका चांगल्या अकाउंटंट ची गरज पूर्ण करण्यासाठी जीएसटीसह विविध करविषयक बदलांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. राजेशाही काळातील दिवाणजीपासून आजचा अत्याधुनिक लेखापाल हा अर्थव्यवस्थेमध्ये एक विकासातील सहयोगी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. बदलत्या करविषयक कायद्यांची माहिती घेऊन प्रॅक्टिस करणे गरजेचे असते त्यासाठी विद्यार्थ्यांनी टॅली, जीएसटी, इन्कम टॅक्स, एक्सेल इत्यादी बाबतचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. चैतन्य सडेकर यांनी कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांची गरज असून महाविद्यालयांनी असे प्रशिक्षण आयोजन करावे यासाठी आमचे मार्गदर्शन नेहमीच राहील आश्वासन दिले.
या कार्यशाळेत बीकॉम व बीबीएचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा. लक्ष्मीकांत बेळेकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. पी.एच कदम यांनी स्वागत केले. कार्यक्रमास डॉ. टी पी शिंदे, वाणिज्य विद्या शाखा इन्चार्ज ज्योत्स्ना बोराटे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख अशोक जाधव, वरिष्ठ लेखापाल श्री कुंमरे, तसेच अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातील प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. ललित वेळेकर सूत्रसंचालन केले. डॉ. सागर निकम यांनी आभार मानले.
