
दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
आयडियल प्ले अबॅकस, चेन्नई यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत फलटणच्या सिद्धी अबॅकस अकॅडमीमधून १२४ विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्वांनी स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले असून सिद्धी अबॅकस अकॅडमीचा निकाल १०० % लागला आहे.
सिद्धी अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांपैकी स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन १९ विद्यार्थी, प्रथम श्रेणी २१ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी ४२ विद्यार्थी, तृतीय श्रेणी १८ विद्यार्थी, चतुर्थ श्रेणी २१ विद्यार्थी, पंचम श्रेणी ३ विद्यार्थी असे सर्व १२४ विद्यार्थी १ ते ५ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
स्पर्धेतील यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांना ५ मिनिटांमध्ये १०० गणिते सोडविणे आवश्यक असल्याचे आणि सिद्धी अबॅकस अकॅडमीचे विद्यार्थ्यांनी वेळेत, काहींनी वेळेपूर्वी सोडविल्याचे अकॅडमीचे संचालक एम. व्ही. जाधव व संचालिका सौ. कल्पना जाधव यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अबॅकसचा डेमो सर्वांच्या समोर सादर केला. या सर्व विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच महाराजा मंगल कार्यालय येथे प. पू. उपळेकर महाराज देवस्थान ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, प्राचार्य रविंद्र येवले, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य भोजराज नाईक निंबाळकर, चंद्रकांत पाटील, सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल व्यवस्थापकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता होते.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल, फलटण मुख्याध्यापिका सौ. संध्या फाळके, श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मिस नसरीन जिरायत, स्व. शीलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा काकडे, ला. दिलीपशेठ गुदेचा, गुरू द्रोणा अकॅडमी अविनाश नरुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी सिद्धी अबॅकस संचालक सौ. कल्पना जाधव व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी गेली १७/१८ वर्षे अविरत मेहनत घेऊन पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांना या आगळ्या वेगळ्या गणिती शास्त्राचे महत्व पटवून दिल्याने आज विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व आत्मविश्वास वाढत असल्याचे निदर्शनास आणून देत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्राचार्य रविंद्र येवले सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना हे विद्यार्थी अबॅकसचा वापर त्यांच्या शाळेतील गणितामध्ये कसा करतात, याविषयी माहिती दिली. हे विद्यार्थी सर्व परीक्षांमध्ये अग्रेसर राहतात व त्यांच्या बौद्धिक क्षमतेत अबॅकसमुळे वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. बाळासाहेब शेंडे यांचेही भाषण झाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षिका सौ. सुनिता जाधव, सौ. पद्मजा जंगम, सौ. सारंगा यादव, सौ. रेखा खिलारे व सौ. पूजा गुळसकर यांचेही कौतुक करण्यात आले.
प्रा. सतीश जंगम यांनी सूत्रसंचालन व समारोप केला. आभार सौ. रेखा खिलारे यांनी मानले.