दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२२ । फलटण । गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत कशाप्रकारे सहभाग घेतात हे पालकांसमोर प्रदर्शित करण्यासाठी ‘स्टुडंट्स लीड कॉन्फरन्स’ चे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेचे उद्घाटन ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ईश्वर गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी अध्ययन केलेले सर्व विषयातील काही घटकांचे पालकांना विविध शैक्षणिक साहित्याच्या सहाय्याने स्पष्टीकरण केले. यामध्ये शाळेतील सर्व वर्गांमध्ये विषयनिहाय विभाग करून प्रत्येक विभागांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसमोर सादरीकरण केले.
यामध्ये इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास, हिंदी, मराठी, कला, कार्यानुभव, क्रीडा या सर्व विषयातील प्रात्यक्षिके तसेच विविध वैज्ञानिक प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थी स्पष्टीकरण करत असताना त्यांच्यातील आत्मविश्वास, संवाद साधण्याची कला पाहून त्यांचे पालकांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रात्यक्षिके पाहून शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे, अकलूज प्रादेशिक उपविभागाचे वाहन निरीक्षक संभाजीराव गावडे यांनी सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्राचार्य गिरीधर गावडे, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.