
स्थैर्य, मुंबई, दि.२५: प्रोडक्ट इंजिनिअरिंग, डेटा ऍनालिटिक्स आणि कोडिंग यांसारखे तंत्रज्ञान आधारित विषय शालेय अभ्यासक्रमाचा भाग असावेत अशी इच्छा विद्यार्थ्यांनी एका सर्वेक्षणाच्या निमित्ताने केली. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस (११ मे)च्या निमित्ताने ब्रेनली या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने तंत्रज्ञानाबाबतचे पर्याय, पसंती आणि उपक्रमांविषयी विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण केले.
१,५०० पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या सर्वेक्षणात ७२% भारतीय विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमात तंत्रज्ञान आधारीत विषय समाविष्ट करण्याची मागणी केली. कोणत्याही शाखेसाठी तंत्रज्ञान शिकणे अनिवार्य झाले असल्याचे ४७% विद्यार्थ्यांनी नमूद केले. या सर्वेक्षणात ५२% विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली तर फक्त ३०% विद्यार्थ्यांनी करिअरच्या इतर पर्यायांना पसंती दिली. ५९% विद्यार्थ्यांनी सांगितले की कोडिंग शिकणे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बिग डेटा आणि इतर तंत्रज्ञानविषयक संकल्पना शिकण्यात त्यांना आवड आहे.
देशभात अजूनही लॉकडाऊन असताना शिकण्याच्या बाबतीत भारतीय विद्यार्थ्यांनी कोणतीही संधी गमावलेली नाही. निम्म्यापेक्षा जास्त (५४%) विद्यार्थी म्हणाले की लॉकडाऊनदरम्यान त्यांनी तंत्रज्ञान संबंधी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला. सर्वेक्षणातील आणखी एक निरीक्षण म्हणजे इंटरनेट हा खरोखर देशाचा खरा सक्षमक ठरला. विशेषत: तंत्रज्ञानविषय शिकण्याकरिता. ४१% विद्यार्थ्यांना वाटते की, या संबंधानी ऑनलाइन प्लॅटफॉर्मनी त्यांना खूप मदत केली. त्यांच्या पसंतीच्या पर्यायांमध्ये यूट्यूब चॅनेल, एडटेक ऍप्स आणि ब्लॉग्स. त्यापैकी २० टक्क्यांनी ऑफलाइन क्लास केले. १५ टक्के विद्यार्थ्यांनी पालकांची मदत घेतली तर ८% विद्यार्थी मित्र आणि समवयस्करांवर अवलंबून होते.
“वास्तविक जगातील उदाहरणे देत शिकवल्यास तंत्रज्ञान शिकता येऊ शकते. तंत्रज्ञानविषयक संकल्पना शिकण्यास भारतातील अनेक विद्यार्थ्यांनी मोठा पाठींबा देणे, हे चांगले लक्षण आहे. विद्यार्थी डिजिटल भवितव्याकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरासाठी त्यांना अनुकूल वातावरण प्रदान केले पाहिजे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आधारीत दृष्टीकोन अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे” असे ब्रेनलीचे मुख्य उत्पादन अधिकारी राजेश बिसाणी म्हणाले.