
स्थैर्य, फलटण, दि. ०६ सप्टेंबर : येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन एका अभिनव उपक्रमाने साजरा करण्यात आला. या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका पार पाडत शाळेचा संपूर्ण कारभार सांभाळला, ज्यामुळे त्यांना जबाबदारी आणि व्यवस्थापन कौशल्याचे प्रत्यक्ष अनुभव मिळाले.
शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थींनी डायरेक्टर, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, विभाग प्रमुख (HOD), क्रीडा शिक्षक, संगीत व नृत्य शिक्षक, लिपिक, शिपाई आणि मदतनीस अशा विविध पदांची जबाबदारी स्वीकारली.
विद्यार्थी डायरेक्टर झालेल्या शर्व भोईटे याने शिक्षकांची बैठक घेऊन कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. या ‘विद्यार्थी शिक्षकां’च्या टीमने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शाळेचे कामकाज यशस्वीपणे पार पाडले. शाळेचे डायरेक्टर शिवराज भोईटे व सेंटर हेड सुचिता जाधव यांनी या विद्यार्थी शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्या आत्मविश्वासाचे आणि जबाबदारीच्या जाणिवेचे कौतुक केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिस्त, वेळेचे नियोजन, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुण यांसारखी जीवनमूल्ये शिकायला मिळाली. शिक्षक म्हणून भूमिका निभावताना शिक्षण क्षेत्रातील व्यापकता आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. हा अभिनव कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक दिवसाचा सोहळा न ठरता एक अविस्मरणीय शिकवण ठरला.