
दैनिक स्थैर्य | दि. ८ जुलै २०२३ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) केंद्र फलटण यांच्यातर्फे विद्यार्थी गुणगौरव व विद्यार्थी शिष्यवृत्ती समारंभाचे रविवार, दि. २३ जुलै २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम फलटणमधील मारवाड पेठेतील नवलबाई मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी ५.३० वाजता होईल.
यावेळी संस्थेच्या सभासदांचे पाल्य ज्यांनी इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्यांनी आपल्या गुणपत्रिकेची प्रत व अर्ज श्री. अनिरुद्ध इनामदार (ब्रह्मचैतन्य स्टोअर्स, ओंकार अपार्टमेंट, शंकर मार्केट, फलटण) यांच्याकडे सादर करावेत. अर्ज भरून देण्याची अंतिम तारीख १८ जुलै २०२३ आहे.
पदवी, पदविका, पोस्ट ग्रॅज्युएशन इ. परीक्षेत उज्ज्वल शैक्षणिक यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. त्यांनीही नावनोंदणी करावी.
यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात येईल. पारितोषिक दहावीमध्ये संस्कृत विषयात सर्वाधिक गुण, इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण, बारावीमध्ये गणित विषयात सर्वाधिक गुण व इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण यांना देण्यात येणार आहे.
शिष्यवृत्ती योजना फक्त सभासदांच्या पाल्यांसाठी आहे. त्यामध्ये बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी पात्र उमेदवारांना फलटण केंद्रातर्फे आर्थिक मदत केली जाते. संबंधित सभासदाने विहीत नमुन्यामध्ये अर्ज सादर करावयाचा आहे.
हा समारंभास संस्थेचे सभासद, देणगीदार, हितचिंतक इ. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी सर्वांनी उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.