माणसातला देव
स्थैर्य, सातारा, दि. १९ : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेच्या साताऱ्यातील प्रथितयश न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी प्रिय शिक्षक काशिनाथ गणेश तथा नानासाहेब द्रविड सर यांचे सोमवारी वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आनंदआश्रम या वृध्दाश्रमाचे संस्थापक, आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शाळेतील नोकरी सोडून सामान्यांना परवडेल असे द्रविड मंगल कार्यालय सुरू केले. ते रा.स्व.संघाचे स्वयंसेवक होते.
नवीन मराठी या प्रार्थमिक शाळेचे संस्थापक कार्यवाह होते. द्रवीडसर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. अत्यंत मॄदूभाषी असलेल्या सरांचा शैक्षणिक सहली आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार असे. तसेच साताऱ्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी वाराणशी ट्रीप आयोजित करून काशीयात्रा घडवली.
वॄध्दाश्रमाच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे व्रत घेतले. मंगलकार्यालय चालवले. विविध माध्यमांतून समाजाभिमुख कार्य करीत राहिले. अभ्यासू मनमिळाऊ व्यक्तिमत्व. हिंदी भाषेवर प्रभूत्व. हिंदी चांगले होण्यासाठी हिंदी गाणी, गझल ऐकायला सांगायचे. सरांनी अंदाजे ५० वर्षापूर्वी सातारा येथे यात्रा कंपनी चालवली होती. पण ती व्यवसायीक स्वरूपात न चालवता वयोवृद्ध लोकांना देवदर्शन घडवण्यासाठी ते प्रयत्न करीत असत.
सरांना संगीताची आवड होती. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुवर्ण युगातील चित्रपट गीते ते आवर्जुन ऐकत त्यामुळे सातारा येथे होणाऱ्या गीतगायनाच्या कार्यक्रमाला एक रसिक म्हणून ते आवर्जून उपस्थित रहात असत.
मनमिळावू वयाचा विचार न करता सर्वांशी मैत्री करणाऱ्या सरांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी त्यांच्यावर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चोरगे, माधव सारडा, जयंत देशपांडे , प्रविण शहाणे तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली.