
दैनिक स्थैर्य । 13 मार्च 2025। सातारा । हणबरवाडी येथील निगडी (ता. कर्हाड) गावच्या हद्दीतील इनाम नावाच्या शिवारातील पाणी पिण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुपारी ही घटना घडली. प्रसाद बापू कोळेकर (वय 13, रा. हणबरवाडी) असे त्याचे नाव असून, तो इयत्ता सातवीत शिकत होता.
प्रसाद रोजच्या प्रमाणे आईसोबत सकाळी शेळ्या राखण्यासाठी रानात गेला होता. आई कामात गुंतली असताना प्रसाद तहान लागल्याने जवळच असलेल्या इनाम शिवारातील शरद घोलप यांच्या विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला. पाणी घेताना त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला. प्रसादला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.
या घटनेनंतर प्रसादची आई त्याला हाक मारत शोधत होती. मात्र, प्रसाद कुठेही दिसला नाही. प्रसादचे वडील बापू कोळेकर यांनी आजूबाजूच्या शिवारात शोध घेतला. त्यावेळी प्रसादचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.प्रसाद अभ्यासात हुशार, होता. तो कुटुंबाचा आधार होता.