दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी जिल्हा परिषद, सातारा संचलित प्रतापसिंह हायस्कूल या शाळेत प्रवेश घेवून शिक्षणाची सुरुवात केली. त्या प्रित्यर्थ शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योति गजभिये, जिल्हा जाती प्रमाणप्रत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष माधवी सरदेशमुख, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणीच्या सदस्या स्वाती इथापे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे, ज्येष्ठ साहित्यक डॉ. आ.ह. साळुंखे, अरुण जावळे आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार श्री. पाटील म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. राज्य शासनाकडून 7 नोंव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस संपूर्ण देशभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना समान जगण्याचा हक्क दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातारच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकले याचा सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रतापसिंह हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले आहे. राज्याच्या तसेच देशाच्या विकासात त्यांचा सहभाग असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी विद्यार्थी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी दिवस हा उत्साहात साजरा करण्यात येत असल्याचे सांगून, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतापसिंह हायस्कूल मध्ये शिकले, ती शाळा जिल्हा परिषदेकडे आहे याचा अभिमान आहे. या शाळेला सोयी-सुविधेबरोबर ही वास्तु जतन करण्यात येईल.
या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.