स्थैर्य, कराड, दि. 29 : ओंड, ता. कराड येथील एका दहावीतील विद्यार्थिनीने ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याच्या नैराश्यातून शनिवारी आत्महत्या केली. या घटनेची नोेंद कराड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओंड, ता. कराड येथील साक्षी आबासाहेब पोळ (वय 15) ही इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. सध्या कोरोनामुळे शाळांचा ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू आहे. साक्षीच्या घरची परिस्थिती बेताची आहे. तिच्या वडिलांचे यापूर्वीचे निधन झाले असून आई मोलमजुरी करते. यामुळे तिच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही. गेल्या काही दिवसांपासून साक्षी आईकडे मोाबईलची मागणी करत होती. मात्र पैसे नसल्यामुळे आपण नंतर मोबाईल घेवू असे आईने तिला सांगितले होते. मात्र, ऑनलाइन शिक्षणासाठी गेल्या चार महिन्यापासून साक्षी शेजार्यांकडे तसेच तिच्या मैत्रिणींकडे अभ्यासाठी जात होती. दररोज मोबाईलसाठी इतरांच्या घरी जाण्याने साक्षी वैतागली होती. या नैराश्यातूनच शनिवारी तिने आत्महत्या केली. शनिवारी सकाळी आई रेशनिंगचे धान्य आणण्यासाठी गेली होती. काही वेळाने धान्य घेऊन ती घरी आली. धान्य घरात ठेऊन मोलमजुरीसाठी ती शिवारात गेली. तेथून तिने शेजारच्या एका मुलीला फोन करून साक्षीला शेतात पाठवून दे असे सांगितले. त्यामुळे संबंधित मुलगी साक्षीला आईचा निरोप देण्यासाठी तिच्या घरी गेली असता साक्षीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मुलीने पाहिले. तिने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिसांत झाली आहे.