एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.३१: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन, या योजनेला दि. ३० सप्टेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्केपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने या योजनेला पुढील सहा महिने म्हणजेच दि.३० सप्टेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भागात एसटी बस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहे असे परिवहनमंत्री श्री. परब यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!