मुक्या जनावरांच्या रक्षणासाठी फलटणच्या ‘सुखकर्ता’ संस्थेची धडपड

अवघ्या १७ वर्षीय शाम पवारचा अनोखा संकल्प; जनजागृतीसह प्रत्यक्ष कृतीवर भर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२३ | फलटण | रोहित वाकडे |
मुक्या जनावरांच्या समस्या मनुष्याकडून सहसा दुर्लक्षित होत असतात. त्यांच्या वेदना सहजासहजी आपल्या लक्षात येत नाहीत. मात्र, फलटण शहरातील शाम संजय पवार (रा.कसबा पेठ, पवार गल्ली) या अवघ्या १७ वर्षीय युवकाने आपल्या ‘सुखकर्ता एन.जी.ओ.’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शहरातील मुक्या जनावरांच्या मदतीला धावून जात त्यांना मायेचा ओलावा देण्याचा अनोखा संकल्प केला आहे.

डिप्लोमाचे शिक्षण घेणार्‍या ‘शाम’शी याबाबत ‘लोकजागर’ने संवाद साधला असता, मुक्या जनावरांसाठी विशेषत: शहरातील मोकाट गायींसाठी आपले काम सुरू असल्याचे सांगून या सामाजिक कार्याची सुरूवात, उद्देश, सद्य:स्थितीत सुरू असलेले उपक्रम याविषयी त्याने सविस्तर माहिती दिली.

अशी झाली सुरूवात….

जनावरांमध्ये लंपीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर सुरू असताना मलठणमध्ये ‘शाम’ला नाकातून रक्त येत असलेली एक मोकाट गाय निदर्शनास आली. त्याला त्या गायीला होणारा त्रास बघवला नाही आणि तिच्यावर उपचार होण्यासाठी त्याने तात्काळ त्या गायीचा फोटो काढून शासकीय आरोग्य यंत्रणेतील परिचितांकडे पाठवला. त्यानंतर त्या ठिकाणी जनावरांचे डॉक्टर आले. पण, सदर गायीला इंजेक्शन देण्याच्या आगोदरच ती तिथून पळून गेली. मग पुढे ‘शाम’ ने त्या गायीला पकडण्यास मदत करण्यासाठी अनेकांना विनंती केली पण; दुर्दैवाने सहजासहजी कुणी पुढे आले नाही. तद्नंतर बर्‍याच प्रयत्नानंतर काही युवकांच्या सहाय्याने ‘शाम’ ने त्या गायीला पकडले आणि डॉक्टरांच्या मदतीने त्या गायीवर पुढे ४-५ दिवस उपचार करण्यात आले. मात्र, सदर गायीला लंपीची तीव्र बाधा झाली असल्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्या गायीला वाचवण्यात अपयश आले. या घटनेनंतर अशा मोकाट जनावरांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, अशी तीव्र जाणीव ‘शाम’च्या मनात आली आणि तिथूनच त्याच्या या कार्याला सुरूवात झाली.

लंपी बाधित अनेक गायींना जीवदान

जनावरांच्या मदतीचे कार्य हाती घेतल्यानंतर अनेक समविचारी मित्रांच्या मदतीने ‘शाम’ला शहरातील अनेक लंपी बाधित गायींना जीवदान मिळवून देण्यात यश आले आहे. वैद्यकीय यंत्रणेच्या मदतीने शहरातील प्रत्येक लंपी बाधित गायीवर उपचार करण्यास सुरूवात करण्यात आली. यादरम्यान या गायींचे विलगीकरण करण्यासाठी मित्रांनी आपले रिकामे प्लॉट उपलब्ध करून दिल्याचेही ‘शाम’ ने आवर्जून सांगितले.

पिडीत जनावरांसाठी तत्परता

जनावरांच्या वेदनांबाबत जागृत झालेल्या मदतीच्या जाणिवेतून सुखकर्ता एन.जी.ओ. पिडीत जनावरांच्या मदतीला तत्परतेने धावून जात असतो. लंपी सारखे संसर्गजन्य रोग, मोकाट जनावरांना होणार्‍या जखमा, मारहाण, अपघात यामुळे होणार्‍या दुखापती आदींवर उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणेच्या मदतीने इंजेक्शन, स्प्रेद्वारे पिडीत जनावरांना वेदनामुक्त करण्यासाठी ‘शाम’ व त्याचे सहकारी तत्परता दाखवत असतात.

उघड्यावर प्लास्टिक पिशवीत अन्नपदार्थ न टाकण्यासाठी जनजागृती

‘सुखकर्ता’ संस्थेच्या वतीने नागरिकांमध्ये मोकाट जनावरांच्या सुरक्षेसाठी उघड्यावर प्लास्टिक पिशवीत अन्नपदार्थ न टाकण्याबाबत जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविली जात आहे. याबाबत माहिती देताना ‘शाम’ने सांगितले की, ‘आपण अन्न पदार्थ व त्यासंबंधीचा कचरा बर्‍याचदा प्लास्टिकच्या पिशवीत भरून टाकतो आणि भूक लागल्यामुळे अन्नाच्या शोधात असणारे प्राणी या सगळ्या गोष्टी प्लास्टिकच्या पिशवी सोबतच खाऊन टाकतात. अशाने वारंवार पोटात प्लास्टिकच्या पिशव्या जाऊन जाऊन त्या प्राण्याच्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्यांचा गोळा तयार होतो आणि दुर्दैव असे आहे की, एकदा पोटात गेलेली प्लास्टिकची पिशवी धड पचतही नाही आणि कुजतही नाही. परिणामी, जनावरांच्या पोटात गेलेली प्लास्टिकची पिशवी तशीच आत राहते. आता ती प्लास्टिकची पिशवी ऑपरेशन करून बाहेर काढण्याशिवाय पर्याय नसतो आणि जर ऑपरेशन नाही केले तर त्या प्लास्टिकच्या पिशवीमुळे त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये नवीन नवीन रोग जन्म घ्यायला लागतात. अर्थात त्या प्राण्याचा अंत व्हायला सुरूवात होते. अशा प्लास्टिक पिशव्या पोटात गेल्याने गरोदर गायींना वेळेआधी प्रसुती होऊन वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागते. वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन त्यांच्या पोटामध्ये होवून अन्न-पाणी घेणे बंद होते. त्यातून अशक्तपणा येवून गायीचा मृत्यूही होतो. शिवाय वेळेआधी प्रसूत झालेल्या नवजात वासराच्या जीवाला धोका असतो. ही विदारक परिस्थिती लक्षात घेवून नागरिकांनी उघड्यावर प्लास्टीक पिशव्यांमधून अन्न पदार्थ टाकणे बंद करावे’. या प्रश्नाच्या जनजागृतीसाठी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमार्फत पालकांपर्यंत पोचता यावे याकरिता शाळांमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच सोशल मिडीयावरही व्हिडीओद्वारे जनजागृती केली जात आहे.

मोकाट जनावरांची तहान भागवण्यासाठी लक्षवेधी उपक्रम

फलटण शहरातील विविध भागात गायींसह वेगवेगळ्या मोकाट जनावरांचा सर्रास वावर असतो. अनेकदा ही जनावरे पिण्याच्या पाण्याच्या शोधात शहरात भटकत असताना एखाद्या घराच्या बाहेर वापरासाठी साठवून ठेवलेल्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी तेथील नागरिकांकडून या जनावरांना हुसकावून लावण्यासाठी मारहाणीचा प्रकार होत असतो. या मारहाणीतून ही जनावरे जखमी होतात. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी सुखकर्ता संस्थेच्यावतीने जनावरांची तहान भागवण्यासाठी शहरात मलठण येथे ५, हाडको कॉलनीत ३, पवार गल्लीत २ आणि संजीवराजे नगर येथे १ अशा एकूण ९ कुंड्या बसवून त्यामध्ये नियमित पाणी भरण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात फिरणार्‍या मोकाट जनावरांना पिण्याचे पाणी रोज उपलब्ध होत असून त्यांना होणारी मारहाण व इजा टळत आहे. या उपक्रमासाठी परिसरातील सार्वजनिक मंडळे, नागरिक यांचेही सहकार्य संस्थेला मिळत आहे. मलठण येथे आणखीन कुंड्यांची आवश्यकता असून त्यानुसार अजून ५ कुंड्या बसवण्याचे नियोजित आहे.

सुमारे ३० सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

‘सुखकर्ता’ संस्थेच्या माध्यमातून हाती घेतलेल्या या सामाजिक कार्यासाठी ‘शाम’ला सुमारे ३० मित्रांची सक्रीय सदस्य म्हणून मोलाची साथ लाभत आहे. जनावरांवर उपचार करताना प्रत्यक्ष फिल्डवर तसेच शाळा, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हे सर्व सदस्य कोणत्याही अपेक्षेविना केवळ मोकाट जनावरांच्या रक्षणासाठी आपले योगदान उत्स्फूर्तपणे देत असल्याचे ‘शाम’ने यावेळी आवर्जून नमूद केले.

दरम्यान, या सामाजिक कार्यास प्रशासनासह नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठबळ आवश्यक आहे.


Back to top button
Don`t copy text!