
स्थैर्य, सातारा, दि. 30 डिसेंबर : घारेवाडी येथे 25 व्या बलशाली युवा हृदय संमेलनास 9 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. युवकांत देशभक्ती, सकारात्मक ऊर्जा, सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, हा संमेलनाचा उद्देश असून, स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रात यश मिळवून समाजात वेगळा ठसा उमटवणार्या प्रेरणादायी व्यक्तीचे मार्गदर्शन संमेलनात लाभणार आहे. यात युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकानी केले आहे.
श्री स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून शिवम प्रतिष्ठानतर्फे घारेवाडी येथे प्रतिवर्षी बलशाली युवा हृदय संमेलन आयोजित केले जाते. युवा संमेलनात विविध वक्त्यांची व्याख्याने होतील. 9 जानेवारीला गुजरात येथील समाजसेविका मित्तल पटेल यांच्या समानता के राह पर विषयावर व्याख्यानाने संमेलनास प्रारंभ होईल. पुण्याच्या सायबर पत्रकार, लेखिकामुक्ता चैतन्य यांचे स्क्रीनटाइमडिजिटल डिटॉक्स या विषयावर, मुंबईयेथील व्यवसायतज्ज्ञ ओंकार माळी हेस्टार्ट-अप-ते एक्स्पोर्टवर व्याख्यान, पर्यावरणतज्ज्ञ सतीश खाडे यांचे तळाच्या पायाच्या भेगा भरशील का रे मेघा या विषयावर व्याख्यान होईल.
दुसर्या दिवशी पहिल्या सत्रात डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांचे अभ्यासासाठी विपश्यनेची उपयुक्तता या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी युवराज पाटील हे नांदेड येथील कादंबरीकार मनोज बोरगावकर यांची प्रकट मुलाखत घेतील. दुपारच्या सत्रात पुण्याचे उद्योजक गावरान कुक्कुटपालन सौरभ तापकीर यांची विपुल धनगर हे मुलाखत घेतील. म्हैसूरच्या समाजसेविका फतिमा शबाना यांची रेणुका कल्पना मुलाखत घेतील.
सायंकाळच्या सत्रात शौर्य पुरस्कारप्राप्त मधुसूदन सुर्वे यांच्याधैर्य आणि समर्पणाची शौर्यगाथा या विषयावर व्याख्यान होईल. तिसर्या दिवशी ऋचिका खोत व स्वामीराज भिसे यांचे कीर्तावनी वारी आडवाटांच्या विठोबाची संकीर्तनाने कार्यक्रम होईल.सिद्धेश युवा समाजसेवक लोकरे यांच्या मिशन 30303 जेन झेड सफर सपनों का या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर संस्थापक इंद्रजित देशमुख यांच्या व्याख्यानाने संमेलनाची सांगता होईल. ऑनलाइन नावनोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील व संयोजकानी केले आहे.

