मराठा आंदोलकांवरील सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध; मराठा समाज झुकणार नाही : जयकुमार शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ६ जुलै २०२१ । फलटण । ‘‘मराठा आरक्षणासाठी सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या मोर्चाच्या विरोधात शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने प्रचंड पोलीस बळ वापरून दडपशाही केली, त्याचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत असून अशा प्रकारे आक्रोश दाबण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज कधी झुकणार नाही’’; असा इशारा भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिला. सरकारची दडपशाही झुगारुन मराठा समाजातील बांधवांनी यशस्वी मोर्चा काढला, याबद्दल त्यांनी आंदोलकांचे अभिनंदन केले.

जयकुमार शिंदे पुढे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण न्यायालयाकडून रद्द झाले. त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील व माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने, जिल्ह्यातील सर्व भाजप व मित्र पक्षाचे आमदार व लोकप्रतिनिधींनी रविवारच्या सोलापूरमधील मोर्चासाठी जय्यत तयारी केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील गावागावातून हजारो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठा स्त्री पुरुष सोलापूरकडे रवाना झाले होते. पण सरकारने पोलिसी बळाचा वापर करून ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांना अडवले आणि सोलापूरमधील मोर्चा होऊ नये यासाठी दडपशाही केली. मराठा समाजातील समन्वयकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या होत्या. पण अशी दडपशाही करून सरकार मराठा समाजाचा आक्रोश दाबू पाहत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. दबाव आणला तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.’’

‘‘भाजपा सरकारच्या काळात लाखो मराठा समाजबांधवांच्या सहभागाने मोर्चे निघाले. आम्ही त्या सर्व मोर्चांचा सन्मान केला. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा मोर्चाच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य करून अंमलबजावणी केली. पण महाविकास आघाडी सरकारचा मराठा समाजाबद्दल एवढा राग आहे की, मराठा समाजाने आपल्या मागण्या मांडणेसुद्धा त्यांना सहन होत नाही. मराठा समाजाने सोलापूरमध्ये रविवारी आयोजित केलेला मोर्चा राजकीय नव्हता. तेथे कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेही पक्षाचा झेंडा आणि बिल्ला बाजूला ठेवून सहभागी झाले होते. पण मराठा समाजाचे आरक्षण घालविणार्‍या महाविकास आघाडी सरकारला आता आवाजही दडपायचा आहे असे दिसते. पण त्यांचा हा हेतू सफल होणार नाही. ते जितकी दडपशाही करतील तितका मराठा समाजातील संताप उफाळेल हे त्यांनी ध्यानात घ्यावे’’, असेही जयकुमार शिंदे यांनी सूचित केले.


Back to top button
Don`t copy text!