दैनिक स्थैर्य | दि. 05 जून 2023 | कोळकी | फलटण शहरासह परिसरामध्ये दुपारी ०४ वाजण्याच्या सुमारास वादळी वारे वाहिल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. फलटण शहराच्या काही भागामध्ये झाडे, झुडपे पडून किरकोळ नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. मुंबई हवामान विभागाच्या सूचनेप्रमाणे सातारा व सोलापूर जिल्ह्यामधील काही ठिकाणी वेगाचे वारे हे दुपारी ३ वाजल्यापासून वाहणार होते. यासोबतच दोन्ही जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस व गारपिटीचा अंदाज सुद्धा मुंबई हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
काही वेळापुरत्या झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. शहरासह उपनगरातील वीजपुरवठा महावितरण कडून तातडीने खंडित करण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
नाना पाटील चौक येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने उभारण्यात आलेली भव्य – दिव्य कमान हि वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली होती. याठिकाणी कोणतीही जीवित हानी झाली नाही. कमान जमीनदोस्त झाल्याची कळताच काहीवेळातच जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून कमान काढण्याचे कामकाज सुरु करण्यात आले.