
स्थैर्य, फलटण, दि. 18 नोव्हेंबर : फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा प्रभाग क्रमांक 8 मध्ये एका नव्या, उत्साही चेहऱ्याने लक्ष वेधून घेतले आहे. हा चेहरा आहे कु. सिद्धाली अनुप शहा यांचा, ज्यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय आखाड्यात पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे, सिद्धाली शहा यांच्या मागे त्यांचे वडील आणि फलटणच्या राजकारणातील एक मोठे नाव, माजी नगरसेवक अनुप शहा यांचा दांडगा अनुभव उभा आहे.
अनुप शहा हे केवळ फलटण शहर नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आदराने पाहिले जाणारे व्यक्तिमत्त्व आहे. प्रशासकीय कामांची सखोल जाण, नगरपालिका कारभाराचा मोठा अनुभव, विरोधकांना अत्यंत परखडपणे धारेवर धरण्याचे कसब आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी ते कायम उपलब्ध असणे, यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आता त्यांनी आपली ही राजकीय आणि सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेण्यासाठी आपली कन्या सिद्धाली शहा यांना नगरपालिकेच्या राजकारणात उतरवले आहे.
अनुप शहा यांच्या याच अनुभवाच्या आणि लोकसंपर्काच्या जोरावर कु. सिद्धाली शहा पालिका निवडणुकीत आपले नशिब आजमावत आहेत. त्यांनी प्रचाराचा धडाका लावला असून प्रभागातील महिला वर्ग, तरुण मतदार आणि सर्वसाधारण मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे. घरोघरी जाऊन त्या मतदारांशी संवाद साधत आहेत, त्यांच्या समस्या समजून घेत आहेत आणि वडिलांच्या कामाच्या जोरावर विश्वास मागत आहेत.
सिद्धाली शहा यांच्या या प्रचार दौऱ्याला प्रभागातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. एका अनुभवी राजकीय वारसा घेऊन आलेल्या सिद्धाली शहा यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 8 ची लढत चांगलीच रंगतदार झाली आहे. अनुप शहा यांच्या कामाची आठवण आणि नव्या पिढीचा उत्साह यांचा समन्वय साधत सिद्धाली शहा विजयाच्या दिशेने कूच करत आहेत. वडिलांचा अनुभव आणि स्वतःचा नवा दृष्टिकोन घेऊन त्या मतदारांना आकर्षित करत असून, या निवडणुकीत शहा घराण्याची परंपरा त्या कशा पुढे नेतात, याकडे साऱ्या फलटणकरांचे लक्ष लागले आहे

