प्रभाग ११ मधून सनी भोई यांची राष्ट्रवादीकडे उमेदवारीची जोरदार मागणी; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


स्थैर्य, फलटण, दि. ९ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारीसाठी सनी ताराचंद्र भोई यांच्या नावाची जोरदार मागणी होत आहे. शनिवारी त्यांच्या प्रचार चर्चेला चांगलीच गती मिळाली. गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या भोई यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

प्रभागातील मतदारांमध्ये सनी भोई यांच्या कामकाजाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे. धनगर वाड्यासह संपूर्ण प्रभागात त्यांनी नियमित संपर्क ठेवला असून, केलेल्या विकासकांमुळे त्यांची ओळख मजबूत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रभागात बळकट करण्यासाठी हा प्रभाग पक्षाकडेच राखून ठेवावा आणि सनी भोई यांना संधी द्यावी, अशी मागणी पक्ष कार्यकर्त्यांनी केली आहे.

पक्षातील बुथ अध्यक्षपदापासून सनी भोई यांनी सातत्याने काम केले आहे. अलीकडेच झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान त्यांनी आपली बाजू प्रभावीपणे मांडली. आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात काम करणारे भोई हे शिवरूपराजे खर्डेकर आणि धीरेंद्रराजे यांचे निष्ठावंत समर्थक म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या संयत आणि अभ्यासपूर्ण मुलाखतीचे जिल्हा पदाधिकारी आणि आमदार सचिन पाटील यांनी कौतुक केले. इतर इच्छुकांनीही अशाच पद्धतीने मुलाखत द्यावी, असा आग्रह यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. यामुळे भोई यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे.

ज्येष्ठ नेते भिमदेव बुरूंगले यांनी मुलाखतीदरम्यान प्रभागातील विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आणि सनी भोई यांच्या कामाचा सकारात्मक उल्लेख केला. तसेच संत भीमा भोई सामाजिक संघटना आणि मच्छीमारी संघटनेनेही त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत मागणी पत्र सादर केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि युवा पदाधिकारी यांनी सनी भोई यांच्या समर्थनात ठराव मंजूर केला आहे. हा ठराव आमदार सचिन पाटील आणि शिवरूपराजे खर्डेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांचा हा उत्साह पाहता पक्षाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

प्रभागात अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पक्षांतर्गत चर्चेला वेग आला आहे. सनी भोई यांच्यासारख्या तरुण आणि तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी भावना जोर धरू लागली आहे.


Back to top button
Don`t copy text!