शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार


दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । पुणे । शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. कृषि योजनांच्या माध्यमातून शेतकरी कुटुंब तसेच गावात निश्चितपणे परीवर्तन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कृषि आयुक्तालय येथे आयोजित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोक्रा) तसेच बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प (स्मार्ट) योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस कृषि आयुक्त धीरजकुमार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे (पोक्रा) प्रकल्प संचालक श्याम तागडे, सहसचिव सरिता बांदेकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. सत्तार म्हणाले, शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण व जीवनमान उंचावण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून त्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील. शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी असलेल्या विविध योजनांच्या अटीमधे आवश्यक बदलही करण्यात येईल, असे ते म्हणाले.

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत प्रगती केलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथांचा प्रचार, प्रसार करावा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांसाठी या यशोगाथा पथदर्शी ठरतील. कृषी योजनांची माहिती कृषी यंत्रणेमार्फत गावातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. गावातील शेतकरी सुखी व्हावा, शासकीय योजनांचा लाभ थेट गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.

‘गोदाम’ योजनेअंतर्गत गाव पातळीवर गोदामांची संख्या वाढविण्याची गरज आहे. गावात गोदाम झाले तर शेतमाल साठवणुकसाठी व्यवस्था होईल. त्यामुळे या योजनेला गती द्यावी, अशा सूचनाही श्री.सत्तार यांनी दिल्या.

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प (स्मार्ट) बाबत आढावा घेताना ते म्हणाले, ग्रामीण भागातील उद्योजकतेला बळकटी देण्यासाठी, तसेच कृषि आधारित व्यवसायांच्या उभारणीला बळकटी व त्यांना अधिक बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांच्या जीवनात निश्चितपणे परिवर्तन होईल, असा विश्वास श्री. सत्तार यांनी व्यक्त केला. संचालक दशरथ तांबोळी यांनी प्रकल्पाबाबत माहिती दिली.

यावेळी कृषी विभागाचे राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालक,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!