सातारा पालिकेच्या कंत्राटी महिला सफाई कामगारांचा संप; काम बंद आंदोलनामुळे साताऱ्यात रस्ते अस्वच्छ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । सातारा शहराच्या वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांसाठी केवळ 30 महिला झाडू कामगार पुरेशा आहेत, अशी भूमिका सातारा पालिकेने घेत उर्वरित 90 महिला कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी अचानक संप करत पालिकेसमोर धरणे आंदोलन केले.महिला कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी आंदोलनाचा इशारा देत तत्काळ सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे.

सातारा शहराची हद्दवाढ झाल्यापासून सातारा शहर आणि हद्दवाढीच्या क्षेत्रातील नवीन भागात कचरा संकलनासाठी घंटागाडी सेवा उपलब्ध केलीआहे. मात्र, सार्वजनिक वर्दळीचे रस्त्यांची स्वच्छता ही कंत्राटी सफाई कामगार यांच्या माध्यमातून केली जाते. सातारा पालिकेकडे 220 कायमस्वरूपी सफाई कामगार अपुरे पडू लागल्याने करार तत्वावरच्या 120 महिला सफाई कामगारांची सेवा गेल्या काही वर्षापासून पालिकेत सुरू आहे.

अलीकडच्या पंधरा दिवसात या सफाई ठेक्याचे नूतनीकरण झाल्याने ठेकेदाराने केवळ तीस सफाई कामगार महिलांना संधी देण्याचे धोरण निश्चित केले आहे. पालिकेने सुद्धा ही सेवा स्वीकारली असून यामागे प्रमुख वर्दळीचे रस्ता स्वच्छतेसाठी इतकी सफाई कामगारांची संख्या पुरेशी असल्याचे मत मुख्याधिकार्‍यांनी नोंदवले आहे, परिणामी उर्वरित 90 महिलांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. सफाई कामगार महिलांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेत पालिकेसमोर आज धरणे आंदोलन केले. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या अध्यक्ष गणेश दुबळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मोती चौकातही जोरदार निदर्शने केली. त्यामुळे शहरातील कोणतेही महत्त्वाचे रस्ते झाडून काढण्यात आले नाही. यासंदर्भात बोलताना गणेश दुबळे म्हणाले, हद्दवाढ नसताना 120 महिला कामगार कामावर होत्या. तेव्हा ही संख्या पालिका प्रशासनाला जास्त कधीच वाटली नाही आणि आता सातारा शहराची हद्दवाढ झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शहराचा विस्तार झाला आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये किमान पंचवीस ते तीस महिलांची सफाईसाठी गरज असताना ठेकेदार व नगरपालिका यांनी सफाई कामगार जादा झाल्याचे कारण देत नव्वद महिलांना घरचा रस्ता दाखवला आहे. हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे. या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा महिलांच्या वतीने देण्यात आला आहे.

आंदोलक महिलांनी व सफाई कर्मचाऱ्यांनी या निर्णयाच्या विरोधात नगरपालिकेत येऊन अतिरिक्त मुख्य अधिकारी पराग कोडगुले यांना निवेदन सादर केले व जुन्या प्रवेशद्वाराच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी केली.


Back to top button
Don`t copy text!