वंचित आघाडीची पोवई नाका येथे निदर्शने
स्थैर्य, सातारा, दि. 10 : भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला करून मोडतोड केली. हा मानवतेवर हल्ला असून शासनाने हल्लेखोर आणि त्यांचा मास्टरमाईंड शोधून कठोर शासन करावे, अशी मागणी करत वंचित बहूजन आघाडीने सातारा येथील पोवई नाक्यावर निदर्शने केली. दरम्यान, डॉ. बाबसाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले, ती शाळा रयत संस्थेला देण्याचा करार रद्द करावा, अशी मागणीही ‘वंचित’ने केली आहे.
याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मनुवादी संस्कृतीने समस्त बहुजन समाजाचा शिक्षणाचा अधिकार हिराववून घेतला होता. तो अधिकार संविधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजास मिळवून दिला. परंतु, बहुजन समाज शिक्षण क्षेत्रात पुढे येऊ लागला लागल्याने मनूवादी विचारांच्या लोकांच्या पोटात गोळा येऊ लागला आहे. श्री श्री रवीशंकर सारखे संविधानद्रोही सरकारी शिक्षण बंद करा आणि प्रायवेट शिक्षणावर भर द्या कारण सरकारी शाळेमधून नक्षलवादी तयार होतात, असे देशद्रोही विधान करतात. अशांवर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा सरकारनेच दाखल करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात एकमेव असे स्वतंत्र हायस्कूल आहे. त्याचे नाव छ. प्रतापसिंह महाराज हायस्कूल असून ते ऐतिहासिक राजवाड्यात सुरू आहे. याला जसा ऐतिहीसिक वारसा आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याच शाळेत वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतले असल्याने या हायस्कुलला वैश्वीक दर्जा मिळाला. हा वारसा सन्मानाने आणी अभिमानाने सातारा जिल्हा परिषदेने सांभाळावयास हवा होता. परंतु, तसे रयत सारख्या संस्थेला तो सांभाळावयास देण्याचा करार जिल्हा परिषदेने केला. हा जिल्हा परीषदेचा करार रद्द करावा, हा वारसा सांभळण्यास जिल्हा परीषद असमर्थ असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीकडे द्यावा, अशीही माग या निवेदनात करण्यात आली आहे.