दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२१ । सांगली । डब्ल्युएचओ व आयसीएमआर ने कोरोनाची तिसरी लाट येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये येण्याची शंका वर्तविली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व सर्व लोकांची सुरक्षितता ठेवण्यासाठी कोरोना लसीकरणाची अत्यंत आवश्यकता असून लसीकरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर कोरोनाला थोपविण्यासाठी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, वारंवार हात स्वच्छ धुणे, गर्दी टाळणे तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन कोटेकोरपणे करावे, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
डॉ. भबान हॉस्पीटल, 100 फुटी रोड सांगली येथे श्री भगवान महावीर कोविड हॉस्पीटल व डॉ. भबान हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापित कोरोना लसीकरण सेंटरचे उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, डॉ. दिनेश भबान, डॉ. निरज भबान, राजगोंडा पाटील, जितेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, गेल्या दीड पावणे दोन वर्षापासून कोरोना संसर्गाशी लढा देत आहोत. कोरोना संसर्गाच्या तीव्रतेमुळे वैद्यकिय सुविधा अधिक वाढविण्याची गरज अधिक जाणवू लागली. त्या अनुषंगाने शासनामार्फत आरोग्य विषयक सुविधांवर अधिक भर देण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेबरोबरच खाजगी डॉक्टर्सही कोरोनाविरूध्दच्या लढ्यासाठी सेवा देत आहेत. ऑक्सिजन, लसीकरणावर केंद्र शासनाचे नियंत्रण आहे. केंद्र सरकारने राज्याला लसीचा कोटा ठरवून दिला आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढविण्यावर अडचणी येत आहेत. तरीही लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे लसीचा कोटा वाढवून देण्यासाठी विनंती केली आहे. लसीची उपलब्धतता पुरेशा प्रमाणात झाली तर निश्चितपणे कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी चांगल्या पध्दतीने काम होईल. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये श्री भगवान महावीर कोविड हॉस्पीटलने केलेल्या कामाचे कौतुक करून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, लसीकरणासाठी शासनाबरोबरच खाजगी डॉक्टरही पुढे आले तर लवकरात लवकर राज्यातील लसीकरण पूर्ण होण्यास मदत होईल व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहू. डॉ. भबान हॉस्पीटल येथील लसीकरण सेंटरमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रास्ताविकात माजी महापौर सुरेश पाटील म्हणाले, नागरिकांच्या सोयीसाठी व लसीकरणाची गती वाढविण्यासाठी डॉ. भबान हॉस्पीटल, 100 फुटी रोड सांगली येथे लसीकरण केंद्र स्थापित करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामधून 18 वर्षावरील सर्वांना कोविशिल्ड ही लस शासकीय दराने देण्यात येणार आहे. लसीकरण नोंदणीसाठी मिलेनियम होंडा कर्मवीर चौक सांगली, सांगली ट्रेडर्स राजमती भवन नेमिनाथनगर सांगली, दांडेकर ॲण्ड कंपनी मारूती रोड व विश्रामबाग सांगली, सांगली ट्रेडर्स चेंबर ऑफ कॉमर्स मार्केट यार्ड सांगली या 5 ठिकाणी सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर लसीच्या उपलब्धतेनुसार लस घेण्यासाठी नागरिकांना लसीकरण सेंटरवर बोलविण्यात येईल. श्री भगवान महावीर कोविड हॉस्पीटल मधून कोरोनाच्या पहिल्या लाटेत 275 रूग्णांहून अधिक तर दुसऱ्या लाटेत 205 हून अधिक रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. या हॉस्पीटलमध्ये 45 ऑक्सिजन बेडची व्यवस्था असून यामध्ये 15 व्हेंटीलेटर बेड असून गरज भासल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठीही हे हॉस्पीटल सज्ज ठेवू, असे ते म्हणाले.
प्रारंभी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. स्वागत डॉ. निरज भबान यांनी केले. आभार राजगोंडा पाटील यांनी मानले.