स्थैर्य, सातारा, दि.२ : जिल्ह्यात 879 ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणी व आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. याचबरोबर जिल्हा परिषद, राज्य उत्पादन शुल्क, नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नुकत्याच दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्हाधिकारी सिंह बोलत होते. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) कीर्ती नलवडे आदी उपस्थित होते. “ज्या शाळांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्या ठिकाणी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी. मतदानाच्या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत रॅम्प, लाईट, पाणी याबाबींची तत्काळ अंमलबजावणी करावी, तसेच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जास्तीतजास्त मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडून निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मतदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी सतर्क राहण्याचे आदेश श्री. सिंह यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात कुठेही अवैधपणे मद्याचे वाटप होणार नाही, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके कार्यान्वित करावीत, तसेच मतदानाच्या पेट्या मतमोजणीच्या ठिकाणी सुस्थितीत नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आवश्यक बस उपलब्ध करण्याबाबतचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिलेल्या आहेत.