
स्थैर्य, फलटण, दि. ०१ : उद्यापासून फलटण शहरामध्ये कटेंटमेंट झोन घोषित करण्यात आलेले आहेत. दि. २ मे ते ७ मे कटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. दवाखाने व मेडीकल वगळता सर्व बाजारपेठ बंद राहणार आहेत. फलटण शहरातील नागरिकांनाची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही. याची विशेष काळजी नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
फलटण शहरातील मंडई व फळ विक्रेते यांना घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. फलटण नगरपरिषदेच्या वतीने लवकरच शहरातील सर्व नागरिकांना भाजी विक्रेत्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच फलटणमध्ये विनाकारण बाहेर फिरणार्यांवर नागरिकांच्यावर पोलिस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
फलटण शहरातील सरकारी व खाजगी सुरू असणारी सर्व प्रकारची बांधकामे ही बंद राहणार आहेत. तर फलटण नगरपरिषदेच्या प्रत्येक वार्ड वाईज नोडल ऑफिसर नेमण्यात येणार आहेत. सरकारी कार्यालयातील फक्त अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणार्यांना कार्यालयात हजर राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे, असेही मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी स्पष्ट केले.