स्थैर्य, सातारा, दि. 17 : रात्री 12 वाजल्यापासून सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाउनला प्रारंभ झाला आहे. शहरामध्ये 450 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून रस्त्यावर विनाकारण फिरणार्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करण्यात येत आहेत.
येत्या 22 तारखेपर्यंत संपूर्णपणे तर 22 ते 26 तारखेपर्यंत अशता स्वरूपात जिल्ह्यात प्रशासनाने कडकडीत जाहीर केला असून त्याला गुरुवारी रात्री बारापासून सुरुवात झाली. आज शुक्रवारी सकाळी सहा ते नऊ या वेळात केवळ वृत्तपत्र वितरण आणि दूध वितरण करण्यात आले. आज पहाटेपासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेट्स टाकण्यात आले असून चौका-चौकात पोलिसांची गस्त वाढविण्यात आलेली आहे टाळेबंदी मुळे संपूर्ण शहरात शुकशुकाट जाणवत असून मुख्य रस्ते ओस पडले आहेत.
सातारा शहरात कडक लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शहरातील राजवाडा राजपत, पोवईनाका, देवी चौक येथील प्रमुख रस्ते असे सुनेसुने दिसत होते. रिमझिम पडणाऱ्या पाऊस सरींमुळे अजिबात नागरिक घराबाहेर पडलेले दिसत नव्हते. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः शहरातून फेरफटका मारून पोलिसांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते पालिकेच्या मुख्याधिकारी सौ रंजना गगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यवतेश्वर, कास, बामणोली आणि ठोसेघर या पर्यटनस्थळांकडे जाणार्या सीमा सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यातील सूत्रांनी दिली.
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने दि. 17 ते दि. 22 जुलै दरम्यान कडक लॉकडाउन घोषित केला . सर्वप्रकारची दुकाने, मार्केट, मॉल, हॉटेल्स, भाजी मंडई उघडण्यास बंदी घालण्यात आली असून विनाकारण रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत मार्गदर्शक आदेशाची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घोषणा केली .
शिवराज पेट्रोल पंप, अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट, वाढे फाटा, खेड फाटा, भीमाबाई आंबेडकरनगर, पोवई नाका, राधिका सिग्नल, शाहू चौक, देवी चौक, कमानी हौद, मोती चौक, शाहूपुरी, मोळाचा ओढा, बोगदा, बुधवार नाका, समर्थ मंदिर, शनिवार चौक या ठिकाणी फिक्स पॉइंट करण्यात आले आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यातील 225, शाहूपुरी पोलीस ठाण्यातील 90, सातारा तालुका पोलीस ठाण्यातील 80 पोलीस आणि 50 होमगार्ड अशा एकूण 450 पोलीस कर्मचार्यांची बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली . त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यातील एक पीआय, दोन एपीआय आणि दोन पीएसआय तर सातारा पोलीस ठाण्यातील एक पीआय, एक पीएसआय आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यातील दोन एपीआय व एक पीएसआय नियंत्रण ठेवत आहेत.
शुक्रवारपासून सुरू होणार्या लॉकडाउनवर अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. रस्त्यावर मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक करणार्या, विनाकारण फिरणार्या आणि रस्त्यावर घोळका करणार्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने पोलिसांना दिल्या आहेत. रस्त्यावर विनाकारण दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन फिरणार्या वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करण्यात येत आहेत. दरम्यान, यवतेश्वर, कास, बामणोली आणि ठोसेघर या पर्यटनस्थळांकडे जाणार्या सीमा सील करण्यात आल्या आहेत,अशी माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस सूत्रांनी दिली.