
दैनिक स्थैर्य । 8 मार्च 2025। सातारा । छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासाबाबत बेताल वक्तव्ये करणार्या विरोधात कठोर राज्य शासनाने कठोर कायदा करावा. छत्रपतींचा इतिहास शासनमान्य करून खंड पद्धतीने तो प्रकाशित करण्यात यावा. तसेच सिनेमॅटिक लिबर्टीतून जो इतिहास मांडला जातो, काल्पनिक चित्र रंगवलं जाते, त्याआधी संबंधित सिनेमाची कथा एका समितीकडून पडताळली जावी, त्या समितीने अभ्यास करून त्याला मान्यता दिल्यानंतरच सिनेमा प्रदर्शित केला जावा. जनतेच्या भावना लक्षात घेऊन जर तुम्ही वागला नाही तर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल; असा सूचक इशाराही छत्रपती उदयनराजे यांनी सरकारला दिला.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासावर वादग्रस्त विधाने करणार्या अशा विकृत लोकांची नसबंदीच केली पाहिजे. ते ना कुठल्या जातीचे, ना कुठल्या पक्षाचे, विकृत लोकांची ही विचारधारा आहे. प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर ही फक्त नावे आहे. उद्या कुणीही असो जर कायदा झाला तर कुणी महाराजांबाबत बोलायचे धाडस करणार नाही. सत्ताधारी, विरोधक किंवा कुठल्याही पक्षाचे असू द्या, आज कित्येक निवेदन देऊन, सांगूनही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासन मान्यतेने आणला जात नाही. सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनमान्य संपूर्ण खंड पद्धतीने प्रकाशित करावा. त्यामुळे इतिहासावरून जे वादविवाद होतात ते संपुष्टात येतील. आज कुणीही काहीही लिहितो, काल्पनिक चित्र रंगवतो याविरोधात सरकारने कायदा आणला पाहिजे.
ते म्हणाले, अनेक कुटुंब, घराणे असतील त्या लोकांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वेचले. एखाद्या काल्पनिक कथेवरून चित्रपट प्रसिद्ध करतात त्याआधी एका समितीसमोर ही स्क्रिप्ट गेली पाहिजे. त्यावर ते अभ्यास करतील, काल्पनिक कथेवर आधारे इतिहास मांडला जातो तेव्हा तेढ निर्माण होतो असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय छावा सिनेमानंतर कालच मला शिर्के कुटुंब भेटायला आले, संभाजी महाराजांना शिर्केनी पकडून दिले असं कुठे इतिहासात नोंद नाही. आज कुठेही ते कुटुंब गेले तर लोकांची त्यांच्याकडे बघण्याची नजर बदलली असं ते सांगतात. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जे करतात त्यांच्याविरोधात याच अधिवेशनात कायदा आणला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना खरेच तुम्ही दैवत मानत असाल तर महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून द्या, याच अधिवेशनात तुम्ही कायदा पारित करा अन्यथा लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडून जाईल असंही उदयनराजेंनी सांगितले.
दरम्यान, कुणीही काही विधाने करतात, त्यातून तेढ निर्माण होतात, दंगली घडतात. लोक मृत्युमुखी पडतात, हे काम थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी नाही तर विरोधक आणि सर्वच लोकप्रतिनिधींचं आहे. त्यामुळे या अधिवेशनात विशेष कायदा आणा, जर तुम्ही केले नाही असाच गोंधळ होत राहील. गोंधळ बंद करा, कायदा पारित करून अशा लोकांना शिक्षा करा. हा कायदा पारीत झाला नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. ही लोकांची मागणी आहे. जर तुम्ही कायदा आणणार नसाल तर तुमचं महाराजांवर अजिबात प्रेम नाही हे लोकांना वाटेल.
खरेच छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल तर कुणीही असो, कुठल्याही पक्षाचे असतील हा कायदा याच अधिवेशनात पारित करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला त्यातून लोकांना एकत्रित करत स्वराज्य निर्माण केले. बाहेरून येणारे आक्रमण परतून लावले. प्रत्येक वेळी शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांविषयी कुणीही उठायचं, काहीही वक्तव्य करायचे असं सुरू आहे. महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. पक्ष कुठलाही असला तरी महाराजांचे नाव घेऊनच सर्व पक्षांची सुरुवात होते. आज जो आपण मोकळा श्वास घेतोय, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी लोकशाहीची संकल्पना मांडली होती. परंतु आज काय चाललंय…? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.