स्थैर्य, फलटण, दि. २४ : सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरिता दि. 24 मेच्या मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केलेले आहेत. दि. 24 मे पासून आठ दिवसाचे सुरु होणाऱ्या संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी करणार आहे, अशी माहिती फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी दिली.
फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे म्हणाले, फलटण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. फलटण तालुक्यात सरासरी प्रतिरोज ३०० ते ५०० च्या पुढे कोरोनाबाधित होत आहेत. फलटण तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्या मुळेच आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊनचे आदेश सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले आहेत. महसूल आणि पोलीस विभागाच्या वतीने कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जेणेकरुन फलटण तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणखीन कमी होण्यास मदत होईल. पोलीस प्रशासन ह्या लॉक डाऊन मध्ये अतिशय कडक भूमिका घेणार आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर कडक कारवाई करून वेळ प्रसंगी गुन्हे दाखल करणार आहे. तसेच तालुक्यातील ज्या गावामध्ये कोरोनारुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावातील ग्रामस्थांच्या महसूल पोलीस विभागाने बैठका घेऊन बाधित लोकांना विलीगीकरण कक्षात दाखल करून घ्यावे अशा सुचना करण्यात आलेल्या आहेत. वाढणारी ही कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरिता लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असून आठ दिवसाच्या कडक लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली पहावयास मिळेल. कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याकरिता प्रशासन आपले काम करीत आहे परंतू नागरिकांनी ही अशा कठीण परिस्थितीत घरी थांबून आपल्या कुटुंबाची काळजी घेत या संकटावर मात करावी, असे हि पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी स्पष्ट केले.