विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी : रस्त्यावर शुकशुकाट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ११: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार विकेंड लॉकडाऊनची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्यात आली. कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने केलेला लॉकडाऊनचा उपाय गरीबांच्या पोटावर मारणारा असल्याने व व्यापारी-व्यवसायिकांचे अर्थचक्र बिघडवणारा असल्याने काहीशा नाखुषीने का होईना पण नागरिकांनी कडक लॉकडाऊन पाळला. यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता.

मार्च, एप्रिल मे महिन्यात लॉकडाऊनमुळे गाळात रुतलेले अर्थचक्र कसेबसे बाहेर निघाले असतानाच विकेंड लॉकडाऊनमुळे अर्थचक्राच्या गाड्याला दोन दिवसांचा ब्रेक लागलाआहे. कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या आदेशानुसार वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली.
सातारा शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता.

सातारा येथील पोवई नाक्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजल्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. शनिवारी सकाळीही शहरातील प्रमुख रस्त्यांवर पोलीस तैनात होते. लॉकडाऊन काळात जाणार्‍या वाहनचालकांना अडवून वैध कारण असल्याबाबत चौकशी केली जात होती. दरम्यान, सातारा, उपनगरे आणि तालुक्यातही सर्व प्रमुख बाजारपेठा बंद होत्या.
खंडाळा तालुक्यात अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य तालुक्याचे ठिकाण असलेल्या खंडाळा तसेच मुख्य बाजारपेठ असलेल्या शिरवळ व परिसरातील सर्व बाजारपेठ, दुकाने, हॉटेल, नागरिकांची रहदारी पूर्णपणे बंद होती. बाजारपेठ बंद असल्यामुळे दररोजचा लाखो रुपयांचा उलाढाल थांबली. जिल्हाधिकारी यांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केल्याने फलटण शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.

मायणीमध्ये सर्वत्र दुकाने बंद ठेवून लॉकडॉऊन करण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र शांतता व शुकशुकाट दिसून येत होता. कातरखटावमध्ये शुक्रवारी काही व्यापार्‍यांनी सायंकाळी सहानंतर दुकाने सुरू ठेवल्याने त्यांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागले. या कारवाईचा धसका घेत आज व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळला.
दहिवडी (ता. माण) येथे कडक लॉकडाऊन प्रक्रिया राबविण्यात आली. दहिवडीच्या चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नियम मोडणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्यात आली असून वाहन धारकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याचे काम दिवसभर सुरू होते. दहिवडीच्या बाजारपेठेत अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने व्यापार्‍यांनी बंद ठेवली होती.
दरम्यान, कोरेगाव, वाई, जावली, महाबळेश्‍वर तालुक्यातही कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ओस पडल्या होत्या.


Back to top button
Don`t copy text!