स्थैर्य, फलटण, दि. १५ : सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात क्रिमीनल प्रोसिजर कोडचे कलम 144 नुसार मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशास फलटण तालुक्यातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे व फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केलेले आहे. या आदेशास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांच्या विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येईल असे फलटण पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी स्पष्ट केले.
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे अनुषंगाने पोलीस प्रशासन महसूल व नगरपालिका यांच्यातर्फे संचलन करून नागरिकांना संचारबंदी आदेशाचे नियमांची अंमलबजावणी बाबत आव्हान करण्याकरिता महात्मा फुले चौक, डेक्कन चौक, महावीर स्तंभ, छ. शिवाजी महाराज चौक, रविवार पेठ, उमाजी नाईक चौक, गजानन चौक असे संचलन करण्यात आले, त्या वेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे व फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर बोलत होते. या वेळी महसूल, पोलीस व नगरपालिका कर्मचारी संचलनात सहभागी झालेले होते.