सामाजिक वातावरण बिघडवणार्‍यांवर कडक कारवाई करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 20 मार्च 2025। मुंबई । औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी नागपूर येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर पोलिसांनी परिस्थिती हाताळत शांतता निर्माण केली होती. परंतु, संध्याकाळी काही असामाजिक घटकांनी एकत्र येत दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. दंगलखोरांनी पोलिसांवरच हल्ला केला. आगी लावल्या, दुचाकींचे नुकसान केले. तसेच पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांवरही हल्ला करण्यात आला. अशाप्रकारे कायदा हातात घेऊन सामाजिक वातावरण बिघडवणार्‍या घटकांवर शासन कडक कारवाई करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नागपूर येथे झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून महाराष्ट्र औरंगजेबाचे उदातीकरण सहन करणार नाही अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेमध्ये मांडली. नागपूर येथील घटनेवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 289 नुसार मांडलेल्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, औरंगजेब हा महाराष्ट्रावरील एक आक्रमक होता. त्याने महाराष्ट्रातील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. मंदिरांची तोडफोड केली. अशा औरंगजेबाचे उदातीकरण करण्यात येत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. नागपूर येथील घटनेत काही असामाजिक घटकांची मजल पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गेली. ही गंभीर बाब आहे. ही घटना म्हणजे एक पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून येते. या घटनेमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले असून त्यामध्ये तीन पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी जखमी झाले. आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच 5 नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत. या नागरिकांवरही उपचार सुरू आहेत, असे श्री.शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील एक शांतताप्रिय शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूर शहरात घडलेली ही घटना अतिशय गंभीर असून यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी आपण सर्वांनी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. याठिकाणी अनेक जाती धर्म एकत्र नांदत आहेत. राज्याचा विकास करत आहेत. राज्याच्या विकासात सर्वांचाच सहभाग आहे. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून असामाजिक घटक अफवा पसरवून अशा घटना घडवत आहेत. यावर नियंत्रण आलेच पाहिजे. अशा असामाजिक घटकांवर कडक कारवाई करण्याची शासनाची भूमिका असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!