स्थैर्य, मुंबई, दि. 6 : राज्यातील निवासी व्यवस्था असणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तब्बल साडेतीन महिने बंद असलेल्या या हॉटेल्सचे दरवाजे 8 जुलैला उघडणार आहेत. मात्र त्यांना एकूण क्षमतेच्या केवळ 33 टक्के क्षमता वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट किंवा उपहारगृहांबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी आधीच केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारीच राज्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. राज्यातील उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल व्यवसायाला देखील कार्यप्रणाली ठरवून देऊन सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल व्यावसायिकांना दिले होते. त्यानुसार आता मिशन बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्यात येत्या 8 जुलैपासून निवासी व्यवस्था पुरविणारी हॉटेल्स, लॉजेस, गेस्ट हाऊस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कंटेन्मेंट एरियातील हॉटेल्सना ही परवानगी नसेल तसेच या हॉटेल्सना त्यांच्या 33 टक्केच क्षमतेचा वापर करता येईल. कंटेंन्मेंट झोनमधील हॉटेल्सना परवानगी मिळणार नाही तसेच स्थानिक गरजेनुसार या हॉटेल्सच्या उर्वरित 63 टक्के मोकळ्या खोल्यांचा क्वारंन्टाईन सुविधेसाठी वापर करता येणार आहे.
हॉटेल्स सुरू करायला परवानगी दिली असली तरी त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. हॉटेल चालकांना गर्दीनियंत्रण, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करावे लागणार आहे. रिसेप्शन, रूम्स, लॉबी आदी सगळीकडे सॅनिटायझरचा मुबलक पुरवठा ठेवावा लागणार आहे. हॉटेलमधील कर्मचार्यांना मास्क, ग्लोव्हज आदी सुरक्षा उपकरणे वापरणे बंधनकारक आहे. पेमेंटसाठी क्यूआर कोड, ऑनलाइन फॉर्म, डिजिटल वॉलेट वापरावे लागणार आहेत. एअरकंडिशनचे तापमान देखील 24 ते 30 डिग्रीच्या दरम्यानच ठेवावे लागणार आहे तसेच ग्राहकांना देखील काही बंधने पाळावी लागणार आहेत. आरोग्यसेतू अॅप डाउनलोड करणे बंधनकारक आहे. कोणतीही लक्षणे नसलेल्या ग्राहकालाच प्रवेश मिळणार आहे. मास्क लावलेल्या ग्राहकालाच प्रवेश मिळणार आहे.