दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२३ । सातारा । बालमजुरी ही अनिष्ठ प्रथा असून त्याचे समूळ उच्चाटन होणे आणि बालमजुरांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट करणे, आवश्यकता असल्यास त्यांच्या कुटुंबीयांचे पुर्नवसन करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात बालकामगार काम करताना आढळल्यास 1098 या टोल फ्री क्रमाकांवर त्वरीत माहिती द्या असे आवाहन करुन कोणत्याही आस्थापनेने बालकामगार कामावर ठेवू नयेत,बालकामगार आढळल्यास संबंधित आस्थापनेवर त्वरीत कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
बालमजुरांची मालकाच्या तावडीतून, छळातून मुक्तता करण्याच्या उद्देशाने गठित करण्यात आलेल्या कृतीदलाची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सहायक कामगार आयुक्त श्री. दिसले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. तावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिर्के, यांची प्रमुख उपस्थिती होती.
धोकादायक उद्योगातील बालकामगारांच्या मुक्ततेसाठी कार्यपध्दती तयार करण्यात आली असून याचा आढावा तसेच अधोकादाय उद्योग व प्रक्रियातील बालमजुरीचे नियमन याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी डुडी यांनी बैठकीत आढावा घेतला. जिल्ह्यात कोणीही बालकामगार कामावर ठेवल्याचे आढळल्यास संबंधीतांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगून कामगार विभागाने उद्योग, हॉटेल्स अशा ज्या कार्यक्षेत्रात बालमजूर कार्यरत असण्याची शक्यता आहे अशा विभागांचे सातत्याने सर्वेक्षण करावे. 14 वर्षाखालील बालमजूर कार्यरत असल्याची माहिती मिळताच, तसेच बालकामगारांची संख्या जास्त असल्यास पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून तात्काळ कृतीदलाच्या धाडी टाकाव्यात. विहित कारवाई त्वरीत करुन बालमजुरांची मुक्तता करावी. बालमजूर ठेवणाऱ्या मालकाविरुध्द बालकामगार अधिनियमातंर्गत कारवाई करावी. धाडीत मुक्त केलेल्या बालकांना बालगृहात पाठवेपर्यंत त्यांची योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येक आस्थापना आणि कारखान्यांमध्ये येथे बालकामगार ठेवले जात नाहीत असा फलक दर्शनी भागात लावल्याची खात्री करावी, बालकामगारांची माहिती घेण्यासाठी कामगार विभागाने सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत स्वतंत्र दुरध्वनी क्र. लवकरात लवकर उपलब्ध करुन द्वावा असेही सूचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी कोणीही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही याची दक्षता घेवून प्रत्येक विद्यार्थी शालेय शिक्षण घेत आहे याची खातरजमा करण्याचे निर्देश दिले.