दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । गोंदिया-भंडारा येथे घडलेली घटना अतिशय लाजिरवाणी आहे. याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येत असून या घटनेतील सर्व आरोपींचा शोध घेवून त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल तसेच यामध्ये बेजबाबदार असलेल्या पोलिसांचे निलंबन करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केली होती. याला उत्तर देतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीडितेसोबत घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली.
संबंधित पीडित महिलेवरील शस्त्रक्रियेची व्यवस्था तसेच मनोधैर्य योजनेंतर्गत मदत करण्यात येत आहे. या घटनेतील आरोपी सापडेपर्यंत चौकशी थांबणार नसल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महिला अत्याचार प्रकरणांमध्ये कार्यवाही करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित असून त्याचे पालन करणे पोलिसांवर बंधनकारक आहे. एकूणच पोलीस आणि वैद्यकीय व्यवस्थाचे या अनुषंगाने प्रबोधन करण्यात येईल, असेही गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शक्ती विधेयक राष्ट्रपती यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. या विधेयकातील काही मुद्द्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने माहिती मागितली आहे. त्याचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे. तसेच शक्ती विधेयक लवकर कायद्यात रूपांतरित व्हावे यासाठी आवश्यक तो सर्वं पाठपुरावा व्यक्तिशः तसेच एक स्वतंत्र अधिकारी नेमून करण्यात येईल, असेही श्री फडणवीस यांनी सांगितले.राज्यात अशा घटना घडू नये यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
या चर्चेत सर्वश्री डॉ.मनीषा कायंदे, शशिकांत शिंदे,अभिजित वंजारी, अमोल मिटकरी, महादेव जानकर, उमा खापरे यांनी सहभाग घेतला होता.