स्थैर्य, मुंबई, दि.२९: जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना दि. 9 एप्रिल 2021 रोजी जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष, रानटी मारहाणीचा व्हीडिओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. शिवराज नारियलवाले हे 9 एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याचसुमारास गवळी समाजाचा एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे तेथे काही लोक तेथे धुडघूस घालत होते. त्यावेळी तेथे उपस्थित काही पोलिस हे गवळी समाजाबद्दल अतिशय अर्वाच्य शब्दात शिविगाळ करीत असल्याने शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिविगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. आपल्या समाजाबद्दल इतक्या आपत्तीजनक शब्दात कुणी बोलत असेल तर त्याचे चित्रीकरण करणे एवढाच काय तो त्यांचा गुन्हा. पण, त्यांना त्याची जी जबर शिक्षा उपस्थित पोलिसांनी दिली, ते या व्हीडिओतून दिसून येते. गणवेशातील 6 आणि गणवेशात नसलेले 2 असे आठ पोलिस त्यांना घेरून अमानूष मारहाण करीत होते. अगदी डोक्यावर सुद्धा मारहाण करण्यात आली.
वस्तुत: रूग्णालयात धुडगूस घालणाऱ्या अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजे नारियलवाले यांचा त्यात समावेश नव्हता. त्यांनी केवळ ती शिविगाळ कॅमेराबद्ध केली, म्हणून संतापाच्या भारात कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या हातात आहे, त्यांनीच कायदा हाती घेतलेला दिसून येतो. यात डीवायएसपी पदावरील व्यक्तीचाही समावेश असणे, हे तर आणखी गंभीर आहे. जर नारियलवाले यांचा कुठे दोष असेल तर गुन्हा दाखल करून रितसर कारवाई पोलिसांना करता आली असती. पण, सराईत गुन्हेगाराला सुद्धा मारहाण करण्यात येत नाही, अशा पद्धतीने नारियलवाले यांना मारहाण करण्यात आली आहे. जवळजवळ दीड महिने नारियलवाले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचंड दहशतीत होते. शिविगाळीचा व्हीडिओ बाहेर न आणण्याची धमकी त्यांना पोलिसांनी दिली होती. अखेर हे डीवायएसपी अॅट्रोसिटीच्या एका प्रकरणात लाच घेताना सापडून निलंबित झाल्यानंतर त्या कुटुंबाला थोडा धीर आला आणि दीड महिन्यांनी हा प्रकार समोर आला. अन्यथा हा प्रकारही कधीच उघडकीस आला नसता. राज्यात कायद्याचे राज्यच नसल्याप्रमाणे अशा घटना घडत असताना त्यावर सरकारचे मौन हे तर अधिकच गंभीर आहे. विशेषत: राज्य सरकारविरोधात भाजपाचे कार्यकर्ते अथवा कुणी सामान्य माणसाने सुद्धा काही प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर दिली तर अशा व्यक्तींना कधी पोलिसांकडून तर कधी राजकीय कार्यकर्त्यांकडून मारहाणीचे प्रकार अलिकडच्या काळात प्रचंड वाढले आहेत. कायद्याचा धाकच उरलेला नाही. आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.