दैनिक स्थैर्य । दि.०६ जानेवारी २०२२ । मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे , अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात श्री. फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, भाजपाच्या स्वस्थ बालक अभियानाच्या प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस खा. संध्या राय, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, माजी मंत्री आ. आशीष शेलार , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले की पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी जे काही घडलं ते अत्यंत गंभीर होतं. या घटनेचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करत आहे. या घटनेची राष्ट्रपतींनी गंभीर दखल घेतली पाहिजे. देशात वेगवेगळया पक्षांची , आघाड्यांची सरकारे आली होती. राज्यात आणि केंद्रात अनेकदा वेगवेगळया पक्षांची सरकारे देशाने पाहिली आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेची स्पष्ट नियमावली आहे. या संदर्भात एसपीजी चा एक कायदा आहे. त्याची एक पुस्तिका आहे पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी ही पुस्तिका राज्याच्या अधिकाऱ्यांशी बोलून तयार होत असते. या पुस्तिकेप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या संबंधित यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करणे अपेक्षित असते.घटनाक्रम पाहिला तर असे लक्षात येईल की, पंतप्रधानांच्या मार्गावर जाणीवपूर्वक आंदोलनाला परवानगी दिली गेली. आंदोलकांमुळे पद्धतशीरपणे रस्ता बंद होईल याची दक्षता घेतली गेली. जेथे हे घडलं तेथून पाकिस्तानची सीमा अतिशय जवळ आहे. पंतप्रधानांचा जीव जाणीवपूर्वक धोक्यात आणण्यासाठी केली गेलेली ही खेळी होती.
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चुका ही देशाच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची गोष्ट असते. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे. या घटनेसंदर्भात काँग्रेस नेत्यांनी अतिशय निर्लज्ज प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान हा देशाचा असतो, कोण्या एका पक्षाचा नसतो. एवढी घटना घडूनही मुख्यमंत्री प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होत नाहीत, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. खालच्या पातळीचे राजकारण करणाऱ्या शक्तींना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही श्री. फडणवीस यांनी नमूद केले.