गंभीर संसर्ग असणाऱ्या कोरोना रूग्णाला उपचार नाकारल्यास कठोर कारवाई – पालकमंत्री जयंत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सांगली, दि.३०: कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रूग्णास रूग्णालयात बेड शिल्ल्क असतानाही दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातून येत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना रूग्णाला उपचार नाकारणाऱ्या अथवा टाळाटाळ करणाऱ्या रूग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपअधिष्ठाता डॉ. प्रदिप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात जवळपास साडेसहा ते सात हजार कोरोना स्वॅब टेस्टिंग करण्यात येत आहे. पॉझिटिव्हीटी रेट टप्प्याटप्प्याने कमी होत असून तो सद्या 17.35 वर आलेला आहे. होम आयसोलेशनमध्ये सुमारे 8 हजार 500 तर कम्युनिटी आयसोलेशनमध्ये 1 हजार 650 रूग्ण आहेत. लॉकडाऊनचा चांगला परिणाम पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असल्याच्या माध्यमातून दिसून येत आहे. सर्वांनी संसर्ग टाळण्यासाठी यापुढेही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 4 हजार 320 बेड संख्या असून यामध्ये 861 आयसीयूमधील बेड्सची तर 3 हजार 459 ऑक्सिजनेटेड बेडची संख्या आहे. आयसीयू बेडची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने शासकीय इमारती वापरात आणाव्यात त्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्यासह सर्व उपचार यंत्रणा सज्ज ठेवावी. आयसीयूमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना आवश्यकतेनुसार ट्रेनिंग द्या. कोणत्याही स्थितीत रूग्ण दगावू देणार नाही अशी जिद्द त्यांच्यात निर्माण करा. तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा आतापासूनच सुसज्ज ठेवा. या लाटेचा लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेवून उपचारासाठी लागणारी औषधे वेळेत खरेदी करून ठेवा. या संदर्भात निर्माण करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सच्या सुचनांनुसार सर्व कार्यवाही करा. कोविड रूग्णांसंबधीची सर्व माहिती पोर्टलवर अद्ययावत ठेवावी. सर्व वॉर्डमध्ये कॅमेरे बसविण्यात यावेत व ते पोर्टलला जोडण्यात यावेत. बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अधिक सक्षम करा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील नादुरूस्त व्हेंटीलेटर्स बाबत आढावा घेवून सदरचे व्हेंटीलेटर्स त्वरीत दुरूस्त करून घ्या असे सांगून जिल्ह्यात जे ऑक्सिजन प्लाँट उभारणी प्रक्रियेत आहेत त्यांची कामे गतीने पूर्ण करून घ्या, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

फळ, भाजीपाला व्यापाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल पण कोरोना संसर्गाची ही वेळ अशी आहे की, सर्वांनीच यामध्ये संयमाने सहकार्य करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या निर्देशास अनुसरून जिल्ह्यातही निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी महानगरपालिकेने कम्युनिटी आयसोलेशनसाठी यंत्रणा वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!