दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२५ | फलटण |
शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्या जीवनात आकार घ्यावा. जीवन हे हसत हसत जगावे. जीवनात ताणतणाव माणसाला विनाशाकडे घेऊन जातात व आयुष्य कमी करते. सध्या परीक्षांचे वारे सुरू झालेले आहे. या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांनी योग्य आहार घेतला पाहिजे. व्यायाम केला पाहिजे, योगासने केली पाहिजेत व वेळापत्रक ठरवून दैनंदिन अभ्यास करून परीक्षेस तणावमुक्त वातावरणात सामोरे गेले पाहिजे, तणावमुक्त जगणे सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन डॉ. दीपक राऊत यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे श्री जितोबा विद्यालय, जिंती, तालुका फलटण येथे कर्मवीर विद्या प्रबोधिनी करियर गायडन्सअंतर्गत ‘परीक्षा व ताणतणाव’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. राऊत पुढे म्हणाले की, परीक्षा ही आपल्या जन्मापासूनच सुरू झालेली आहे. ती आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याबरोबरच येणार आहे. त्यामुळे परीक्षेस न घाबरता निर्भयपणे सामोरे गेले पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपणाला वेगवेगळ्या परीक्षांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कधी कधी ताणतणाव येतो. जीवन हे अधिक सुंदर करण्यासाठी तणावविहिरीत जीवन जगा.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक व समुपदेशक ताराचंद्र आवळे होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थी हा सक्षम, सुदृढ व जीवनात यशस्वी होईल असाच निर्माण केला जातो. आपल्या विद्यालयामध्ये जे विविध उपक्रम राबवले जातात, त्यामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो. परीक्षेपूर्वी आणि परीक्षेत ताणतणाव येऊ नये म्हणून योग्य आहार व दररोज व्यायाम करून आपले मन व शरीर सुदृढ केले पाहिजे. नियमित अभ्यासाने आपणावरती ताणतणाव येणार नाही. त्यासाठी वेळच्या वेळी अभ्यास करणे ही काळाची गरज आहे.
सूत्रसंचालन अंकुश सोळंके यांनी केले. गौरी जगदाळे यांनी प्रास्ताविक केले तर आभार पौर्णिमा जगताप यांनी मानले.
यावेळी प्रदीप माने, विद्या जमदाडे, अर्चना सोनवलकर, शितल बनकर, गजानन धर्माधिकारी, राजेंद्र घाडगे व नववी दहावीचे विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.