दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरणघाट उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरणाच्या कामांच्या प्रस्तावाबाबत जलसंपदा विभागाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
मंत्रालयातील जलसंपदा मंत्री यांच्या दालनात चंद्रपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाचा भाग असलेल्या सावली तालुक्यातील हरणघाट उपसा सिंचन योजनेच्या विविध कामांना मंजुरीसाठी झालेल्या बैठकीत जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, लघु पाटबंधारेचे उपसचिव अमोल फुंदे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री.देवगडे उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री श्री.पाटील म्हणाले, आसोला मेंढा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात हरणघाट उपसासिंचना योजना येतात. या उपसा सिंचन योजनेचे लाभ क्षेत्र हे असोलामेंढा प्रकल्पाचेच आहे. त्या नियोजनानुसार या योजनेचे काम करण्यात येत आहे. या योजनेची देखभाल व दुरूस्ती करण्याकरिता नव्याने सुचविण्यात आलेल्या कामांना लवकरच मंजुरी मिळेल अशी ग्वाही श्री.पाटील यांनी दिली.
हरणघाट उपसा सिंचना योजनेमुळे शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी हंगामातही पिके घेता येतील – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
पालकमंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, हरणघाट उपसासिंचन योजनेतंर्गत लघुकालवे व वितरीका ह्या बहुतांशी नादुरूस्त असून बरीच बांधकामे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच सर्व्हेक्षणांती येथे लाभक्षेत्र देखील वाढलेले आहे. चांदापूर लघुकालवा क्रमांक १, राजगड वितरीका, चांदापूर लघुकालवा क्रमांक २, बोरचांदली वितरीका,फिस्कटी लघुकालवा, विरई वितरीका, जुनासुर्ला वितरीका व लघुकालवा सर्व लघुकालव्यांची दुरूस्ती होणे अत्यंत आवश्यक आहे कारण या उपसा सिंचन योजनेमुळे शेतक-यांना रब्बी तसेच उन्हाळी हंगामातही पिके घेणे शक्य होणार आहे. या कालव्यांच्या नूतनीकरणासाठी आवश्यक अंदाजपत्रके तयार केली असून याला लवकरात लवकर मान्यता मिळावी अशी मागणी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी बैठकीत केली.