दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । मुंबई । स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. मुंबईत आयस्ट्रीम काँगेस 22 या परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
श्री.मुनगंटीवार म्हणाले की, हे माध्यम दुधारी आहे. त्याचा सकारात्मक उपयोग करायचा की नकारात्मक हे आपल्या हातात आहे. त्यामुळे स्ट्रीमिंग उद्योगाने देश उभारणीत आपला वाटा सकारात्मक पद्धतीने उचलावा. आज प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी असतो, त्यामुळे या उद्योगाचा प्रत्येकाच्या जीवनावर थेट प्रभाव पडतो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मनोरंजन कर कमी करत या उद्योगाला मदत केली. महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही ठामपणे या उद्योगाच्या पाठी उभे आहोत.
श्री.मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की, आज अमेरिकेत लाखो विद्यार्थी संस्कृत शिकत आहेत, तर जर्मनीमधल्या विद्यापीठांमध्ये भारतशास्त्र (इंडॉलॉजी) अभ्यासक्रमांना प्रचंड मागणी आहे. जगभरात भारताचे आकर्षण वाढले आहे. अशावेळी स्ट्रीमिंग उद्योगाने भारतीय संस्कृती व ज्ञान परंपरा जगासमोर चांगल्या पद्धतीने मांडण्याची गरज आहे.
यावेळी हरित नागपाल, प्रसाद संगमेश्वरन, सत्रजीत सेन, शाहबाझ खान आदी उपस्थित होते.