
स्थैर्य, साखरवाडी, दि. १९ ऑगस्ट : साखरवाडी आणि परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, रस्त्यावरून फिरणारे नागरिक, शाळकरी मुले आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने यावर तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.
साखरवाडी बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर २० ते २५ कुत्र्यांचे टोळके सतत फिरताना दिसत आहेत. विशेषतः मटन आणि चिकनच्या दुकानांभोवती त्यांचा वावर जास्त असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. “मुलांना शाळेत पाठवताना आम्हाला सतत काळजी वाटते. पावसाळ्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोका अधिक असतो,” अशी भीती एका पालक महिलेने व्यक्त केली.
मागील महिन्यात एका दुचाकीस्वारासह पादचाऱ्याला कुत्रा चावल्याची घटना घडली होती. मात्र, त्यावेळी स्थानिक सरकारी दवाखान्यात रेबीजची लस उपलब्ध नसल्याने वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत, ज्यामुळे नागरिकांमधील भीती अधिकच वाढली आहे.
शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालताना धोका निर्माण झाला आहे, तर वाहनचालकांनाही अपघाताची भीती वाटत आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.