
स्थैर्य, सातारा, दि. 7 ऑगस्ट : ओझर्डे (ता.वाई) येथे शेतात लावलेली सुमारे एक लाख रुपये किमतीची स्ट्रॉबेरीची रोपे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरून नेली आहेत. यामुळे परिसरात चोर्यांच्या प्रमाणामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत महेंद्र भिलारे (वय 36) यांनी भुईंज पोलिसात तक्रार दिली आहे.
पाचगणी (महाबळेश्वर) येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी वाई तालुक्यातील ओझर्डे गावासह विविध गावांत खंडाने शेतजमिनी घेऊन विविध प्रकारच्या स्ट्रॉबेरी रोपांची लागवड करत असतात. मे, जून महिन्यांच्या दरम्यान ही रोपे लावलीजातात व ऑक्टोबर महिन्यात ती लावणीस तयार रोपे पिशवीत भरून लागवडीसाठी नेली जातात.
त्याचपद्धतीने पाचगणी – भिलारयेथील महेंद्र भिलारे यांनी ओझर्डे येथील सोनेश्वर शिवारात सुमारे एक एकर क्षेत्रावर लेअर जातीचे मदर प्लांट लावले होते. त्यावर सुमारे एक लाख रुपये खर्च केला होता. सध्या एक महिन्याच्या अंतराने ही रोपे काढण्यास तयार झाली असती. तयार होण्यापूर्वीच चोरट्यांनी त्यावर डल्ला मारला आहे. त्यामुळे शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.