स्ट्रॉबेरी उत्पादकांनी जी.आय नोंदणी करून QR कोडचा वापर करावा – डॉ. सुभाष घुले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२१ । सातारा । महाबळेश्वर पंचक्रोशितील स्ट्रॉबेरीचे मार्केटिंग करतांना जी.आय नोंदणी करून “QR कोड म्हणजेच मार्केटिंग” असे समजून शेतकऱ्यांनी QR कोडचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याची संधी शेतकऱ्यांना प्राप्त झाली आहे. QR कोडमुळे ग्राहकांना शेतमालाच्या गुणवत्तेबाबत हमी मिळणार असुन, शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्यास मदत होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ,कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापुर, आणि श्रीराम फळ प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. भिलार यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम दूध डेअरी सभागृह भिलार येथे आज शेतमालाच्या गुणवत्तेसाठी QR कोडच्या वापराबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. सुभाष घुले म्हणाले स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी जी.आय मानांकन नोंदणी करून निर्यात वाढवावी. QR कोडमुळे ग्राहकांना स्ट्रॉबेरी उत्पादना संदर्भातील उत्पादकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, उत्पादनाविषयी सविस्तर माहिती, भौगोलिक ठिकाण, उत्पादन काढल्याचे दिनांक, पॅकिंग केल्याचे दिनांक इ. बाबतची माहिती प्राप्त होणारआहे. QR कोडच्या वापरामुळे शेतकरी मार्केटिंगसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डिजिटलायझेशनच्या युगामध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

या कार्यशाळेच्या प्रसंगी नितीन भिलारे यांनी, महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला जी.आय. मानांकन प्राप्त झाले असल्याने वैयक्तिक नोंदणी फी फक्त १० रु. झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर पंचक्रोशितील सर्व स्ट्रॉबेरी उत्पादकांनी श्रीराम संस्थेच्या माध्यमातून जी.आय. ची वैयक्तिक नोंदणी करावी. तसेच श्रीराम संस्थेच्या माध्यमातून चालू हंगामात १०० स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी नोंदणी करून QR कोड चा वापर करतील असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यशाळेसाठी श्रीराम फळ प्रक्रिया सहकारी संस्था मर्या.भिलारचे चेअरमन गणपत रामचंद्र पारठे, माजी सभापती,बाजार समिती राजेंद्र भिलारे, सरपंच शिवाजी भिलारे, पोलीस पाटील गणपत भिलारे, श्रीराम विकास सोसायटी चेअरमन आनंदा भिलारे, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी शशिकांत भिलारे, कृषी विपणन तज्ज्ञ,सांगली प्रसाद भुजबळ. उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र भिलारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!